Press "Enter" to skip to content

आंदोलक शेतकरी रामाचा विरोध करताहेत का? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य!

नवीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकर्‍यांचे आंदोलन आजही सुरू आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर नाना तर्हेचे प्रयत्न केले जाताहेत. सध्या एका फोटोच्या आधारे शेतकरी रामाचा (farmers opposing lord ram) विरोध करत असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

फोटोत एका मोर्चा दरम्यान काही लोक दिसताहेत आणि त्यांच्या हातात एक काळ्या रंगाचा बॅनर आहे. या बॅनरवर ‘न मोदी, न योगी, न जय श्रीराम, देश पर राज करेगा मजदूर किसान’ अशा प्रकारचा नारा लिहिलेला आहे.

याच फोटोच्या आधारे सोशल मीडियावर ‘मोदी आणि योगींपर्यंत तर ठीक परंतु रामाचा विरोध करणारे (farmers opposing lord ram) भारताचे शेतकरी असू शकत नाहीत’ असा दावा करण्यात येतोय. गौरव प्रधान यांच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा फोटो जवळपास ५७८ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता आम्हाला साधारणतः २ वर्षांपूर्वीच्या फेसबुक पोस्टमध्ये हा फोटो मिळाला. ‘जन गन मन की बात’ या फेसबुक पेजवरून ६ डिसेंबर २०१८ रोजी हा फोटो शेअर करण्यात आला होता. म्हणजेच हा फोटो सध्याच्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील नसून किमान २ वर्षांपूर्वीचा तरी आहे.

किसान आंदोलन अपने चरम पर, किसानों की माँग जायज है और सबको मानना होगा नही तो ये आंदोलन दिल्ली से भी आगे जा सकता है।

Posted by Jan Gan Man Ki Baat on Wednesday, 5 December 2018

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘ब्लूमबर्ग क्विन्ट’च्या एका ट्विटमध्ये देखील हा फोटो मिळाला. या ट्विटची तारीख ३० नोव्हेंबर २०१८ अशी आहे. कर्जमुक्ती, पिकांसाठी चांगला हमीभाव यासह आपल्या विविध मागण्यांबाबत देशभरातील शेतकरी दुसर्‍या दिवशीही आंदोलन करत आहेत, असं फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

त्यानंतर आम्ही गुगलवर २०१८ मधील शेतकरी आंदोलनाविषयी माहिती शोधली. नोव्हेंबर 2018 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्तीशी संबंधित विविध मागण्यांवरून दिल्लीत निदर्शने केली होती. या निदर्शना दरम्यानचा हा फोटो आहे. 

कम्यूनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाने देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो साधारणतः २ वर्षांपूर्वीच्या शेतकरी आंदोलनातील मोर्चा दरम्यानचा आहे. या फोटोचा सध्याच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- शाहिनबागच्या आंदोलनातील दादी पंजाबी शेतकरी बनल्याचा कंगना राणावतकडून फेक दावा

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा