अब्दुल नावाचा एक ज्यूसवाला रंगेहाथ पकडला गेला असून तो आणि त्याचे मुस्लीम मित्र देशभरातील हिंदूंना ज्यूसमधून, खाद्यपदार्थांतून बेमालूमपणे ‘वंध्यत्वा’च्या म्हणजेच मुल न होण्याच्या गोळ्या (infertility tablets) आणि रसायने देताहेत, असे दावे करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
"अब्दुल हे फळ विक्रेत्यांचे नाव आहे. तो फळांच्या ज्यूसची दुकाने चालवितो आणि संपूर्ण भारतभरात त्याचे मुस्लिम मित्र आणि नातेवाईक यांच्याद्वारे अशीच दुकाने चालवली जातात. तो वंध्यत्व गोळ्या आणि इतर औषधे हिंदू ग्राहकांच्या फळांच्या रसात मिसळतो. तो केवळ फळांच्या रसात चिरलेला अॅसिडिक आणि निराशाविरोधी गोळ्या हिंदूंनाच त्याच्या रस दुकानातून विकत आहे. तो सकाळी गर्दी येण्यापूर्वी तयार मिश्रण घेऊन येतो. काउंटरच्या खाली पाणी घेण्याच्या बहाण्याने तो गोळा करतो आणि फळांच्या रसात चव नसलेला द्रव मिसळतो. दुकानातून वारंवार फळांचा रस पिणारा एक ग्राहक संशयास्पद झाला. त्याने गाडीच्या मागील बाजूस तपासणी केली तेव्हा पिवळ्या रंगाचे पाणी आणि लघवीने भरलेले पात्र शोधून तो थक्क झाला. हे सर्व येथे व्हिडिओ दिले आहे. त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली असता, त्या मुलाने कबूल केले की तो लोकसंख्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी वंध्य हिंदूंकडे फळांच्या रसांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये गोळ्या मिसळत होता. त्याचप्रमाणे, नुकत्याच केरळमधील टीव्ही वाहिन्यांनी कॅलिकट आणि मलप्पुरममध्ये एका मुस्लिम मुस्लिम रेस्टॉरंट शृंखलामधून वंध्यत्वाच्या गोळ्या जप्त केल्या आणि कसे हस्तगत केले याचा पर्दाफाश केला होता. ते बिर्याणीत मिसळत असत आणि हिंदू हिंदूंनाच विकत असत. या मुस्लिम रेस्टॉरंट साखळ्यांमध्ये छापा टाकल्या गेल्या की त्यांच्या गोळ्या रेस्टॉरंट्सच्या सर्व शाखांमध्ये वितरीत केल्या गेल्या. अहो हिंदू, जर तुम्ही किंवा तुमची मुले किंवा इतर कुटुंबातील सदस्यांनी बाहेरून खाणे किंवा अन्न विकत घेण्याचे निवडले असेल तर अश्या लोकांन पासून संभाळून रहा. हे आपल्या स्वतःच्या सुरक्षितता आणि आरोग्यासाठी आहे.मित्रानो, सर्वांनी स्वतःच्या आणी परिवाराच्या भविष्यासाठी मुस्लिमांच्या धंद्यावर जाऊन व्यवहार करणे बंद करा ,अन्यथा मोठा धोका होऊ शकतो."
या अशा मजकुरासह ४.५० मिनिटाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
मराठीत व्हायरल होत असलेल्या दाव्यातील मजकूर हा इंग्रजी व्हायरल दाव्यातील मजकुराचा जसाशतसे ‘गुगल ट्रान्सलेशन’ आहे. ते इंग्रजीमधील दावे ट्विटरवर देखील व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील , राजेंद्र काळे आणि अनिल पाटील यांनी व्हॉट्सऍपवरही हे दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल दाव्यामध्ये तीन मुख्य बाबी आहेत.
१. व्हायरल व्हिडीओत नागरिकांना मोसंबी ज्यूसमध्ये काही पिवळे द्रावण मिसळवणारा मुस्लीम विक्रेता आढळला आहे आणि त्याविषयी ते त्याची चौकशी करतायेत.
२. व्हिडीओतील अब्दुल प्रमाणे त्याचे मुस्लीम मित्र आणि नातेवाईक भारतभर हिंदू ग्राहकांना ज्यूसमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या आणि रसायने मिसळून पाजत आहेत.
३. केरळमध्येही मुस्लीम रेस्टॉरंट चेन मधून अशाच प्रकारच्या गोळ्या जप्त केल्या. ते खाण्यामध्ये हिंदूंना या गोळ्या देत असत.
‘चेकपोस्ट मराठी’ने या दाव्यांची एकेक करून पडताळणी केली.
- व्हायरल व्हिडिओ निरखून पाहिल्यास त्यावर उजव्या कोपऱ्यात ‘Awareness Now’चा लोगो बघायला मिळतोय. तसेच त्यावर त्यांचाच वाटरमार्क आहे.
- हाच धागा पकडत आम्ही फेसबुकवर ‘Awareness Now’ चे पेज शोधले. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ या पेजवर १४ फेब्रुवारी २०२० रोजी अपलोड केल्याचे आढळून आले.
- सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडीओ अपलोड करत असताना त्यांनी केवळ दोन ओळीचे कॅप्शन दिले आहे.
‘Be careful while drinking and eating from food stalls on street. मोसम्बी जूस के नाम पे ये चीज़ पी रहे थे लोग|
- मूळ व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये व्हायरल दाव्यातील मजकुरात लिहिल्याप्रमाणे त्या ज्यूसवाल्याने वंध्यत्वाच्या गोळ्या अथवा काही रसायन मिसळल्याचा उल्लेख नाही.
- म्हणजेच ज्या पेजने तब्बल वर्षभरापुर्वी हा व्हिडीओ अपलोड केलाय त्यांचा स्वतःचा असा दावा नसताना सदर व्हिडिओ अचानक व्हायरल करत त्यात ‘वंध्यत्वाच्या’ गोळ्यांचा दावा नेमका आला कुठून हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
- मूळ व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सदर व्यक्ती कुठले घातक केमिकल नव्हे तर ‘फूड कलर’ आणि ‘इसेन्स’ मिसळवत होता असे अनेकांचे म्हणणे आहे. या गोष्टी ब्रांडेड प्रॉडक्ट्समध्येही टाकल्या जातात.
- व्हायरल मजकुरात केरळ मधील मुस्लीम रेस्टॉरंट चेन मधून वंध्यत्वाच्या गोळ्या जप्त केल्याचा उल्लेख आहे. याविषयी आम्ही गुगल सर्च केले असता एकही बातमी आम्हाला सापडली नाही.
- याउलट अशा प्रकारचे दावे व्हायरल होत होते आणि ते फेक होते अशी माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका बातमीतून मिळाली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. वर्षभरापूर्वीचा एक व्हिडिओ घेऊन त्यासोबत निराधार, मनमानी मजकूर चिकटवून देशातील हिंदू-मुस्लीम सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय.
हेही वाचा: वक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला?
[…] हेही वाचा: मुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध… […]