‘डी-मार्ट’च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांसाठी फ्री गिफ्ट (d’mart 20th anniversary free gifts) मिळवण्याची संधी उपलब्ध असल्याचा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय. व्हाट्सएप मेसेजच्या इमेजमध्ये dmartindia.com नावाची वेबसाईट देखील दिसतेय. फ्री गिफ्ट मिळविण्यासाठी या लिंकवर क्लीक करण्याविषयी सांगण्यात आले आहे.
लिंकवर क्लीक केल्यावर काय होते?
- लिंकवर क्लीक केल्यावर तुम्ही ‘डी-मार्ट’ सारख्या दिसणाऱ्या वेबसाईटवर पोहोचता. तिथे तुम्हाला गिफ्ट जिंकण्यासाठी चार प्रश्नांचे उत्तर देण्याविषयी सांगितले जाते. ही प्रश्नावली पूर्ण केल्यानंतर तुम्ही काही ५००० रुपये जिंकल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल स्क्रिनवर दिसायला लागतो.
- गिफ्ट जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन करतानाच गिफ्ट मिळवण्यासाठी स्क्रिनवर दिसणारा मेसेज ५ व्हॉट्सऍप ग्रुप्स किंवा २० वैयक्तिक नंबर्सवर पाठविण्यास सांगितले जाते. बऱ्याच जणांकडून या ही लिंक पुढे पाठवली जाते पण त्यांना काही गिफ्ट मिळत नाही.
- गिफ्ट न मिळण्याचं कारण असं की ‘डी-मार्ट’कडून अशा प्रकारचे कुठलेही गिफ्ट्स (d’mart 20th anniversary free gifts) दिले जात नाहीयेत. शिवाय ज्या वेबसाइटवरून तुमच्याकडून तुमची सर्व वैयक्तिक माहिती घेतली गेली, ती ‘डी-मार्ट’ची अधिकृत वेबसाईट देखील नाही. हा केवळ तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा डाव आहे. या खेळीत आपण स्वतःची तर माहिती देऊन बसतोच सोबतच आपण इतरांना लिंक्स पाठवून त्यांचीही माहिती देण्यास त्यांना परावृत्त करतो.
- आपण आपल्या व्हॉट्सऍपवरून त्या लिंकवर क्लिक केलेलं असतं तेव्हाच आपल्या व्हॉट्सऍपला जोडलेली आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहचलेली असते. ही अशी माहिती गोळा करून ते विविध टेलिमार्केटिंग कंपन्यांना किंवा स्कॅम-फ्रॉड करणाऱ्या टोळीला विकतात. म्हणूनच आपल्याला सातत्याने नको असलेले कॉल येत असतात.
मेसेज फेक आहे हे कशावरून?
- ‘डी-मार्ट’च्या वेबसाईटवर स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की ‘डी-मार्ट’चे कस्टमर केअर क्रमांक https://www.dmart.in/ आणि https://www.dmartindia.com/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कृपया इतर कुठल्याही अनोळखी नंबरवर कॉल करू नये किंवा स्पेलिंगमध्ये सारखेपणा असणाऱ्या वेबसाईटवर देखील क्लीक करू नये. ही कदाचित फिशिंग वेबसाईट असू शकते. फिशिंग साईटवरून तुमचा पासवर्ड, क्रेडीट कार्ड डीटेल्स इत्यादी वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.
- इमेजमध्ये dmartindia.com दिसत असले तरी क्लीक करण्यासाठीची जी लिंक आहे, ती भलतीच आहे. म्हणजेच तुम्ही dmartindia.com नाही तर भलत्याच लिंकवर करून भलत्याच वेबसाईटवर पोहोचताय.
- वेबसाईटच्या खालच्या भागात काही कमेंट्स बघायला मिळतात. तुम्ही कितीही वेळा आणि कधीही लिंकवर क्लीक केलं, तरी या कमेंट्समध्ये काहीही बदल होत नाही. ना कमेंट्सची संख्या वाढते, ना कमी होते. शिवाय कुठल्याही कमेंटला लाईक केलं जात नाही किंवा त्यास रिप्लाय देता येत नाही. या कमेंट्स केवळ साईट खरी असल्याचा भास निर्माण करण्यासाठी असतात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘डी-मार्ट’च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांसाठी फ्री गिफ्ट मिळवण्याची संधी उपलब्ध असल्याचा दावा करणारा व्हायरल मेसेज फेक आहे. ‘डी-मार्ट’कडून अशा प्रकारचे कुठलेही गिफ्ट्स दिले जात नाहीयेत.
कोणत्याही नामांकित कंपन्या अशा कुठल्याही प्रकारे विनाकारण फ्री गिफ्ट्स वाटत नाहीत. अशा काही ऑफर्स असतील तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरच असतात. अशा प्रकारच्या लिंक्सच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे कुठल्याही व्हायरल लिंक्सवर क्लिक करून आपली वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक माहितीची गुप्तता धोक्यात आणू नकात.
हेही वाचा- ‘फ्लिपकार्ट’च्या ऍनिव्हर्सरी निमित्त फ्री गिफ्ट मिळवण्याची संधी लिहिलेल्या लिंकवर क्लिक करू नका!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment