“सगळीकडे चर्चेत असलेल्या ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ या होमिओपॅथीक औषधाचा प्रचार आणि वाटप जर का दाट लोकवस्तीच्या ठिकाणी केला गेला तर तिथल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढु शकते. आयुष मंत्रालयाने परवानगी दिलेल्या ह्या औषधाचे काही साईड इफेक्ट पण नाहीत असे ऐकले आहे. केरळ मध्ये हे औषध दिले गेले आहे” असं एक ट्विट
फेसबुकवर स्वतःची ओळख ‘हेल्थ कन्सल्टंट’ म्हणून सांगणाऱ्या गिरिधर पाटील यांनी देखील ‘प्रहार डिजिटल’चा एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये होमिओपॅथिक औषध ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ काय आहे, ते कसे बनवतात आणि कोरोनापासून बचावासाठी ते किती उपयुक्त आहे याची माहिती सांगण्यात आली आहे.
या अशा बातम्यांमुळे आणि आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनेमुळे विविध संस्था आणि नेते मंडळींनी नागरिकांत या गोळ्याचं वाटप सुरु केलं आहे. २५ मे रोजी ‘प्रहार’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आमदार नितेश राणे यांनी ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ च्या तब्बल दहा लाख गोळ्यांच्या वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी आयुष मंत्रालयाने याविषयी नेमकं काय सांगितलंय हे पाहण्याचा प्रयत्न केला. आम्हाला शासनाच्या अधिकृत बातम्या सांगणाऱ्या प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो (PIB)चं २९ जानेवारीचं ट्विट सापडलं. यामध्ये आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सल्ल्यांचा रिपोर्ट मिळाला.
रिपोर्टमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या उपायांची लिस्ट होती. या उपाययोजनांच्या आधारे कोरोना संसर्गापासून बचाव केला जाऊ शकतो असं त्यात म्हटलं आहे.
कोरोनापासून बचावासाठी होमिओपथी कशी मदत करू शकते याबद्दल चर्चा करण्यासाठी ६४ वी बैठक २८ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आली होती. या बैठकीस उपस्थित तज्ज्ञांनी ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करू शकते असं सांगितलं. सोबतच हे औषध एन्फ़्लुएन्झा सारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक औषध म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते.
तज्ज्ञांनी उपाशी पोटी सलग तीन दिवस ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ च्या गोळ्या घेण्याचा सल्लाही दिला. जर कोरोना व्हायरसच्या केसेस राहिल्याच तर एक महिन्याने पुन्हा एवढ्याच गोळ्या अशाच पद्धतीने घेण्याचंही सांगण्यात आलं.
यामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ गोळ्यांचा वापर सांगताना ‘prophylactic medicine’ असा शब्द वापरण्यात आलाय आणि इंफ्लूएन्झा बद्दल सांगताना ‘prevention’ असा शब्द वापरला गेलाय.
‘प्रिव्हेन्शन’ म्हणजे प्रतिबंधात्मक. आजार होऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी आणि गुगल ट्रान्सलेशन नुसार ‘प्रोफीलॅक्टिक’ म्हणजे ‘रोगप्रतिबंधात्मक औषध किंवा औषध’. जेव्हा ‘रोगप्रतिबंधात्मक औषध’ या अर्थाने आपण तो शब्द घेतो तेव्हा तो कोरोना होऊ नये म्हणून घेतलेलं औषध असा होतो आणि जेव्हा ‘औषध’ या अर्थाने घेऊ तेव्हा तो कोरोना संसर्गावर उपाय म्हणून ते औषध आहे असं सांगितल्याचं दिसतं.
आयुष मंत्रालयाने दिलेल्या पत्रकात ‘फ्ल्यू’ साठी ‘प्रिव्हेन्शन’ असा थेट अर्थाचा शब्द वापरला पण कोरोना संदर्भात काहीसा गोंधळ निर्माण होईल असा शब्द का वापरला गेलाय यावर मात्र आम्हाला काही ठोस उत्तर मिळालं नाही.
म्हणून मग आम्ही या पत्रकाबद्दल जगभरातील शास्त्रज्ञाचं काय मत आहे हे तपासण्याचा प्रयत्न केला. ‘चेकपोस्ट मराठी’ला जगभरातील विज्ञान आणि विज्ञानविषयक संशोधनाबद्दल बातम्या देणाऱ्या ‘सायन्स अलर्ट’ या न्यूज वेबसाईटचा एक लेख सापडला. त्यात त्यांनी आयुष मंत्रालयाच्या या पत्रकाची खिल्ली उडवली आहे.
त्यात पुढे जाऊन ते असं म्हणतात की ‘‘अर्सेनिकम अल्बम ३०’ म्हणजे काय तर हा खूप जास्त डायल्यूट केलेला आर्सेनिक ट्रायऑक्साईड आहे. हे रसायन जर चुकीच्या पद्धतीने शरीरात गेले तर प्राणघातक ठरू शकते. मुळात हे रसायन कोरोना व्हायरस विरोधात लढू शकत असल्याचे कुठलेच पुरावे उपलब्ध नाहीत.’
‘द हिंदुच्या’ २२ मे रोजी प्रकाशित झालेल्या ‘Homeopathy drug untested for efficacy against COVID-19 widely distributed in Mumbai’ या बातमीत असं म्हटलंय की ‘एका बाटलीत ९० छोट्या गोळ्या असतात, ज्या एका कुटुंबासाठी बरेच महिने पुरतील एवढ्या आहेत. या गोळ्या आर्सेनिक टॉक्साइडची ‘वॉटर मेमरी’ धरून असतात. आर्सेनिक टॉक्साइड मूळ स्वरुपात विषारी रसायन आहे. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात डायल्यूट केलं जातं की त्याचे केवळ नॅनो पार्टीकल त्या सोल्युशनमध्ये शिल्लक राहतील आणि त्याचा विषारी गुण निघून निष्क्रिय होईल.
‘वॉटर मेमरी’ ही संकल्पना जगभरात अजूनही काहीशी वादग्रस्तच आहे.
‘द हिंदू’च्या याच बातमीत पुढे म्हटलंय की ‘अनेक तज्ज्ञ मंडळींचा ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ च्या थेट नागरिकांमधील वितरणाला विरोध आहे. H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू फैलावाच्या काळात या औषधाने बरीच मदत केली होती पण आयुष मंत्रालयाने सुचविल्याप्रमाणे ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ औषधाचा कोरोनावरील उपाय म्हणून वापरास कसलाही आधार नाही.’ महाराष्ट्र होमिओपथी कौन्सिलचे माजी अध्यक्ष बाहुबली शहा यांनी ‘द हिंदू’शी बोलताना ही माहिती दिली आहे.
पुढे ते असंही म्हणाले की, ‘या अशा थेट बहुसंख्य वितरणात दुसरी एक अडचण अशी आहे की ज्या लोकांना हे औषध दिलं आहे त्यांचे डीटेल्स घेतले जात नाहीयेत. औषधाच्या वितरणासाठी काही एक नियमावली असायला हवी, त्यावर अभ्यास करण्यासाठी काही सूचना असायला हव्यात. आता नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, महानगरपालिका असे ज्यांना कुणाला ते औषध उपब्ध होत आहे ते सगळेच वाटत बसले आहेत, त्यात कसलेली रेकॉर्ड ठेवत नाहीयेत.’
छाती विषयक आजारांचे नामांकिततज्ज्ञ डॉ. झरीर उदवाडिया कोव्हीड-१९च्या राज्य टास्क फोर्सचे सभासद आहेत. त्यांनी ‘द हिंदू’ला असं सांगितलं की ‘अजूनही अशा कुठल्या अल्टरनेटिव्ह औषधांची कसलीच चाचणी घेतली नाहीये, माझ्या मते ही अशी औषधं अगदीच अत्यावश्यक म्हणून उल्लेखायला नकोत.’
वस्तुस्थिती:
- ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्यांनी कोरोना बाधित रुग्ण बरा होतो की तो प्रतिकारशक्ती वाढवणारा प्रतिबंधात्मक उपाय आहे हे आयुष मंत्रालयाच्या पत्रकात स्पष्ट होत नाहीये.
- ‘सायन्स अलर्ट’ आणि ‘द हिंदू’ मध्ये प्रकाशित तज्ञांच्या लेखांनुसार हे रसायन जर चुकीच्या पद्धतीने शरीरात गेलं तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
- त्याच प्रमाणे ज्यांना या गोळ्या दिल्या आहेत त्यांना कोरोना होणारच नाही किंवा झालेला बरा होईल असा खात्रीशीर पुरावा किंवा कसलेही संशोधन उपलब्ध नाही.
- जे लोक या गोळ्या वाटत आहेत त्यांनी या गोळ्या नेमक्या कुणाला वाटल्या गेल्या आहेत आणि त्याचे नेमके काय परिणाम त्यांच्यावर होताहेत याची नोंद ठेवणे अपेक्षित आहे, परंतु तसे होताना दिसत नाही.
- त्यामुळे या अशा कुणा तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय जर गोळ्या घेतल्या गेल्या, त्यातलं प्रमाण चुकीचं असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्याची जबाबदारी नेमकी कुणाची? असे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.
हे ही वाचा- रामदेव बाबा यांचा ‘१ मिनिट श्वास रोखून कोरोना टेस्ट करण्याचा’ दावा सपशेल चुकीचा
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] विरोधच केल्याचा इतिहास आहे. ते ‘होमिओपॅथी‘चे समर्थक आहेत ज्यास आधुनिक […]