Press "Enter" to skip to content

देशात विक्रमी लसीकरण पूर्ण झाल्याच्या आनंदात सर्व भारतीयांना तीन महिन्यांसाठी मिळणार मोफत रिचार्ज?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय, ज्यामध्ये दावा केला जातोय की देशात विक्रमी पातळीवर कोरोनाचे लसीकरण पूर्ण झाल्याच्या आनंदात सर्व भारतीय मोबाईल ग्राहकांचे फोन ३ महिन्यांसाठी मोफत रिचार्ज (free recharge for 3 months) केले जाणार आहेत.

Advertisement

व्हायरल मेसेजमध्ये Jio, Airtel किंवा Vi या कंपन्यांचे ग्राहक संबंधित ऑफरचा लाभ उठवू शकतील, असे सांगण्यात येतेय. ऑफरचा लाभ घेण्यासाठी एका लिंकवर क्लीक करण्याचे आवाहन केले जात आहे. ऑफर केवळ ३० नोव्हेंबर पर्यंतच लागू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Source: whatsapp

पडताळणी:

देशभरात लसीकरणाने चांगला वेग पकडलेला आहे. मात्र सर्व भारतीय ग्राहकांचे मोबाईल ३ महिन्यांसाठी मोफत रिचार्ज (free recharge for 3 months) केले जाणार असल्याची कुठलीही घोषणा अगर बातमी आमच्या बघण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही दूरसंचार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर अशा प्रकारची कुठली घोषणा करण्यात आली आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अशी कुठलीही माहिती आम्हाला मिळाली नाही.

दरम्यान, अधिक शोध घेतला असता असे आढळून आले की अशाच प्रकारचे मेसेजेस गेल्या महिन्यात देखील व्हायरल झाले होते. त्यावेळी ऑफर १५ ऑक्टोबर पर्यंत लागू राहणार असल्याचा दावा करण्यात आला होता. सध्या व्हायरल होत असलेला मेसेज देखील पूर्वीच्या मेसेजप्रमाणेच आहे. या मेसेजमध्ये फक्त १५ ऑक्टोबरच्या ऐवजी ३० नोव्हेंबर एवढाच बदल करण्यात आला आहे.

तीन महिन्यांच्या मोफत रिचार्ज संबंधीचे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण मंत्रालयाकडून यासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले होते. संबंधित मेसेज चुकीचा असून सरकारकडून अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आली नसल्याचे या ट्विटमध्ये सांगण्यात आले होते.

मेसेजमधील लिंकवर क्लीक करू नका !

मेसेजमधील लिंकवर क्लीक करू नकात. तसे करणे कदाचित सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महागात पडू शकते. तुमची वैयक्तिक माहिती गोळा करण्याच्या हेतूने अशा प्रकारचे मेसेजेस नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी व्हायरल केले जातात. या माध्यमातून गोळा करण्यात आलेली तुमची वैयक्तिक माहिती विविध टेलीमार्केटिंग कंपन्यांना विकली जाते.

यापूर्वी अशाच प्रकारचा मेसेज ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली व्हायरल झाला होता. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोदी सरकारकडून ३ महिन्याचा इंटरनेट रिचार्ज मोफत दिला जात असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता. ‘चेकपोस्ट मराठी’ने त्यावेळी देखील या दाव्याची सविस्तर पोलखोल केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झाले आहे की देशात विक्रमी पातळीवर कोरोनाचे लसीकरण पूर्ण झाल्याच्या आनंदात सर्व भारतीय मोबाईल ग्राहकांचे फोन ३ महिन्यांसाठी मोफत रिचार्ज केले जाणार असल्याचे दावे पूर्णतः चुकीचे आहेत. अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशा प्रकारचे दावे करणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लीक करून तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा हा सापळा आहे. तेव्हा या सापळ्यात अडकू नका.

हेही वाचा- तुमची KBC च्या २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी निवड झाल्याचे मेसेज आल्यास सावधान!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा