सोशल मीडियावर साधारणतः ३० सेकंदांचा व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओत बुलडोजरच्या साहाय्याने काही मुर्त्या हटविल्या जात असताना बघायला मिळतंय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की कोरोना काळात मदत न केल्याने चिडलेले हिंदू धर्मीय लोक आपल्या देवदेवतांच्या मुर्त्या तोडून इस्लाममध्ये प्रवेश करताहेत.
गायस खान या फेसबुक युजरकडून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ९४ हजार पेक्षा अधिक युजर्सकडून शेअर केला गेलाय. व्हिडिओसोबत जो ऑडिओ आहे त्यात म्हटलंय,
“भारतात नवीनच गोंधळ माजलाय. हिंदू लोकांनी आपल्या देवदेवतांच्या मूर्ती तोडायला सुरुवात केली आहे. संकटकाळात मदत करू न शकलेल्या तुमच्या अस्तित्वाचा काय फायदा? कुराणमुळे आमचे डोळे उघडले की आम्ही आमच्याच मातीने तुम्हाला घडवलं आणि तुमची पूजा करतोय. जर तू आम्हाला वाचवू शकत नसशील तर तुझ्या असण्याचा काय फायदा? अनेक हिंदू एकत्र जमले आहेत आणि इस्लाम स्वीकारून ते आपल्या देवदेवतांच्या मुर्त्या तोडत आहेत.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओ कुठला आहे आणि व्हिडिओत नेमकं काय चाललंय, हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला साधारणतः असाच व्हिडीओ ‘एबीपी अस्मिता’ या एपीबी समूहाच्या गुजराती न्यूज चॅनेलच्या युट्युबवर बघायला मिळाला.
‘एबीपी अस्मिता’च्या युट्यूब चॅनेलवरून ११ ऑगस्ट २०१९ रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओचे कॅप्शन आहे भक्तांनी अहमदाबादच्या नदीकाठी सोडल्या दशा मातेच्या मूर्ती.
गुजरातमध्ये दशामातेचे व्रत असते. या व्रतानंतर नदीमध्ये मुर्त्यांचे विसर्जन केले जाते. मात्र जलप्रदूषण टाळण्यासाठी दशामातेच्या मूर्तीच्या विसर्जनाऐवजी या मूर्ती साबरमती नदीच्या काठावर ठेवल्या गेल्या होत्या. आम्हाला अहमदाबाद महानगरपालिकेचे माजी आयुक्त विजय नेहरा यांचं एक ट्विट देखील मिळालं. या ट्विटमध्ये देखील नेहरा यांनी हीच माहिती दिली होती.
नेहरा यांच्या या ट्विटच्या प्रत्युत्तरात अशा प्रकारे बुलडोजरच्या मदतीने या मुर्त्या हटविण्यात आल्याने दुखावल्या गेलेल्या एका ट्विटर युजरने ‘धन्यवाद’ अशा कॅप्शनसह सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता.
यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली की व्हिडीओ आताचा नसून तो ऑगस्ट २०१९ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे व्हिडिओचा कोरोना महामारीशी संबंध जोडण्याच्या दाव्यांना काहीही अर्थ उरत नाही.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओचा कोरोना संकटाशी किंवा हिंदूंच्या इस्लाम धर्म स्वीकारण्याशी कसलाही संबंध नाही. व्हिडीओ साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा असून अहमदाबाद महापालिकेकडून नदी किनाऱ्यावरील मुर्त्यांच्या लावलेल्या विल्हेवाटीचा हा व्हिडीओ आहे.
हे ही वाचा– ना ते कोव्हीड सेंटर ‘आरएसएस’ने उभारलंय; ना ते स्टेडियम इंदौर मध्ये आहे!
Be First to Comment