Press "Enter" to skip to content

‘सेना जल’ खरेदी करून देशभक्ती दर्शविण्याच्या नादात होऊ शकते फसवणूक! वाचा सत्य!

‘आर्मी वाईव्ज वेल्फेअर असोसिएशन’ने अतिशय स्वस्त दरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. इतर कुठल्या ब्रांडचे पाणी घेण्यापेक्षा हे ‘सेना जल’ (Sena Jal) विकत घ्या. यातून आलेला पैसा हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबासाठी खर्च होणार आहे. ‘सेना जल’ सर्वत्र उपलब्ध आहे, असे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत.

Advertisement

ट्विटर, फेसबुकपेक्षा हे दावे ‘व्हॉट्सऍप’वर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संदीप पाटील, शैलेश चौधरी आणि प्रा. संतोष साखरीकर यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

Source: Whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की हे दावे २०१८ सालापासूनच व्हायरल होतायेत.

संस्थेविषयीची माहिती चुकीची:

व्हायरल मेसेजमध्ये संस्थेचे नाव ‘आर्मी वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडियन आर्मी’ असे दिले आहे, परंतु खरे नाव केवळ ‘आर्मी वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन’ एवढेच आहे. याच नावाच्या शॉर्ट फॉर्मवरून म्हणजेच ‘AWWA’ने संस्थेचा उल्लेख केला जातो.

मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की सदर संस्थेची स्थापना जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांनी केलीय परंतु संस्थेच्या अधिकृत वेबसाईटनुसार सदर संस्थेची स्थापना २३ ऑगस्ट १९६६ साली झालीय; दिवंगत मधुलिका रावत यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९६३ साली झाला होता. म्हणजेच संस्थेच्या स्थापनेवेळी त्या अवघ्या ३ वर्षाच्या होत्या. त्या काही काळ संस्थेच्या अध्यक्षा होत्या, त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर जनरल मनोज नरवणे (General Manoj Naravane) यांच्या पत्नी विना नरवणे (Veena Naravane) संस्थेच्या अध्यक्षा बनल्या आहेत.

‘सेना जल’ निर्मितीचा उद्देश खरा:

केवळ ६ रुपयांत अर्धा लिटर आणि १० रुपयांत १ लिटर या दराने पिण्याचे पाणी ‘सेना जल’ (Sena Jal) नावाने उपलब्ध करण्याचा निर्णय AWWA ने घेतला. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यातून होणारा नफा शहीद जवानांच्या विधवा पत्नींच्या उपयोगात आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला गेला. याविषयी विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

संस्थेच्या वेबसाईटवरील नव्या माहितीनुसार २५० मि.ली. पाण्याची बाटली ५ रुपयांत आणि ५०० मि.लीची ७ रुपयांत विकण्याचा नवा निर्णय घेतला गेलाय. परंतु यात कुठेही या उत्पादनाच्या वितरणाविषयी माहिती दिलेली नाही.

‘सेना जल’ वितरण:

‘एबीपी न्यूज’च्या एका बातमीनुसार हे ‘सेना जल’ केवळ भारतीय सेनेच्या कार्यक्रमांतच उपलब्ध असणार आहे. यासाठी सेना युनिट्स, रेजिमेंट्स संस्थेला पैसे देईल. हे पाणी सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचा कुठलाही अधिकृत निर्णय घेतलेला नाही.

व्हायरल पोस्ट्समुळे अनेकांना हे पाणी कुठे मिळेल? याच्या वितरणाची जबाबदारी कशी घेता येईल याविषयी मोठी उत्सुकता आहे. तशा पद्धतीने शोध घेतला जात आहे. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी विविध वेबसाईट, ब्लॉग्ज देखील तयार झाले आहे. ‘सेना जल’ डीलरशिप, सेना जल डीस्ट्रीब्यूटरशिप अशा शीर्षकाने सुरु झालेले अनेक ब्लॉग उपलब्ध आहेत. ‘पीएममोदी योजना’ नावाच्या वेबसाईटवर ‘सेना जल’च्या वितरणाविषयी माहिती दिली गेलीय. यामध्ये ठोस माहिती दिलेली नाही परंतु याच संधीचे सोने करण्याचा प्रयत्न एखाद्याने केला तर डीलरशिप मिळवून देण्याचे आश्वासन देऊन कुणीही कधीही फसवणूक करू शकते.

Source: Google

‘सेना जल’ सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे का याविषयीची कुठलीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेली नाही. याविषयी आम्ही AWWA शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या तरी ‘सेना जल’ सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दाव्यांमधील बहुतांश माहिती चुकीची आहे. अशा मेसेजचा आणि सामान्य नागरिकांच्या ‘देशभक्ती’चा गैरफायदा घेत कुणी फसवणूक करू शकतो त्यामुळे ‘सेना जल’ची डीलरशिप, डीस्ट्रीब्यूटरशिप घेण्याच्या नादात स्वतःचे आर्थिक नुकसान करू नका. संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीलाच प्रमाण मानावे.

हेही वाचा: देशात फक्त हिंदू मंदिरांनाच कर भरावा लागतो? मस्जिद, चर्चला सूट? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा