Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरेंची पाठराखण करणाऱ्यांनी ‘मिरर ईमेज’ म्हणत केलं चुकीचं समर्थन!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर व्हिडीओ कॉन्फरन्स मिटिंगच्या वेळी महाराष्ट्राचा नकाशा उलटा लावल्याचे म्हणत विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांची पाठराखण करण्यासाठी समर्थक पुढे सरसावले आहेत. पाहूया सविस्तर काय घडलंय.

हल्ला:

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आलाय.

मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील हे ट्विट आहे. त्यात काही मजकुर आणि एक फोटो दिसतोय. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या समोर लॅपटॉप, मागे भारतासह विविध देशांचे झेंडे आणि त्यामागे एका बोर्डवर महाराष्ट्राचा उलटा नकाशा असं सगळं दिसतंय.

त्या इमेज सोबत काही मजकूर सुद्धा पोस्ट केला गेलाय-

Advertisement

‘महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.” याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह! सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला..’

या फोटोतील नकाशावरून फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मिडीयात मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली नसती तरच नवल.

नंदुरबार भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिलदादा वासवे यांचं ट्विट:

बीजेपी परभणी या हँडल वरील ट्विट:

देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंट वर काय लिहिलंय पहा-

‘फक्त खुर्चीसाठी सत्तेत बसणाऱ्यांनी महाराष्ट्र चौपट करून ठेवला. महाराष्ट्राचा नकाशाही उलटा “करून दाखवला”’

फक्त खुर्चीसाठी सत्तेत बसणाऱ्यांनी महाराष्ट्र चौपट करून ठेवला. महाराष्ट्राचा नकाशाही उलटा "करून दाखवला" !

Posted by Devendra Fadnavis for Maharashtra on Tuesday, 16 June 2020

प्रतिहल्ला:

नकाशा उलटा लावला म्हणत विरोधकांनी सगळीकडूनच उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करायला सुरुवात केलं तसं मुख्यमंत्र्यांचे समर्थक आणि भाजपा विरोधक पुढे सरसावले. तो नकाशा तसा उलट का आहे याची कारणं देऊ लागले.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1719133994915670&set=a.157506291078456&type=3&theater

पडताळणी:

सोशल मीडियात चालू झालेलं हे हल्ल्या-प्रतिहल्ल्याचं शीतयुद्ध पाहून ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात केली.

सर्वात आधी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर जाऊन बघितलं. तिथे आम्हाला हे ट्विट दिसलं. ज्यात खरोखर महाराष्ट्राचा नकाशा उलटा आहे. म्हणजेच नकाशा उलटा करून लावण्याचा, फोटो एडीट करण्याचा खोडसाळपणा नाही हे तर सिद्ध झालं.

मग आम्ही त्यासोबतचा मजकूर वाचला. यात असं लिहिलंय की ‘
‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० रोडमॅपचा शुभारंभ. १६००० कोटींपेक्षा जास्त गुंतणूक असणाऱ्या परदेशी कंपन्यांसोबत १२ मोठ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार’

१५ जूनच्या संध्याकाळी ७.१८ वाजताचं हे ट्विट आहे. पाश्चिमात्य देशांच्या वेळेच्या सोयीनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या मिटिंगच्या सुरुवातीचे हे ट्विट आहे. हे ट्विट व्हिडिओ कॉन्फरन्सवर होणार असल्याने समोर लॅपटॉप ठेवलाय आणि त्याच्याच वेबकॅम वरून व्हिडीओ कॉन्फरन्स झालेली आहे.

त्यामुळे लॅपटॉप किंवा त्यासमोरची पाटी कॉन्फरन्स अटेंड करणाऱ्या व्यक्तीला दिसण्याचा संबंध नाही. पण मग त्या मागच्या उलट्या नकाशाचं काय?

आम्ही ती इमेज झूम करून पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की केवळ नकाशाच नाही तर त्यासोबत असणारे दोन्ही लोगो सुद्धा उलट आहेत. बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की त्यांच्या खालचा मजकूर म्हणजेच MIDC, MAHARASHTRA ही नावे सुद्धा उलट आहेत.

zoomed image to show inverted map and names
credit: twitter

यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे समर्थकांनी असं म्हंटलय की वेबकॅमेरा हा आपल्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेरा सारखा असतो. यात आरशाप्रमाणे आपली प्रतिमा उलटी दिसते. समोरच्या लोकांना आपल्या मागील वस्तू, नावे, लोगो सरळ दिसावेत म्हणून ते वास्तवात उलटे लावावे लागतात. त्यासाठीच महाराष्ट्राचा नकाशा, त्याच्या आसपासचा मजकूर उलटा लिहिलेला आहे.

‘चेकपोस्ट मराठी’ने ‘मिरर ईमेज’ समर्थनाची सुद्धा शहानिशा करून पाहिली. आम्ही स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सचा प्रयोग करून पाहिला आणि समोर काय सत्य आलं तर,

आपण स्वतः जेव्हा वेबकॅम समोर बसून बोलू लागतो तेव्हा आपल्या स्वतःच्या स्क्रीनवर आपली ‘मिरर ईमेज’ दिसते परंतु जेव्हा ती समोरच्या व्यक्तीच्या स्क्रीनपर्यंत पोहचते तेव्हा ते व्हिडीओ कॉलिंग/कॉन्फरन्सींग ऍप त्या मिरर इमेजला सुलट करून दाखवतो. म्हणजेच आपण आहे असेच दिसतो.

अजून सोप्या शब्दात ‘मिरर इमेज’ समर्थनाची पडताळणी:

समर्थकांनी सांगितल्या प्रमाणे जर समोरच्या व्यक्तीला ते उलट दिसलं असतं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मागच्या सर्व गोष्टी या अशा दिसल्या असत्या. उजवीकडचे झेंडे डावीकडे गेले असते डाव्या बाजूला असणारा मुख्यमंत्र्यांचा खिसा आणि त्यातला पेन उजवीकडे गेला असता.

mirror image experiment of CM VC pic
credit: twitter

परंतु हे असं झालं का? नाही. उद्धव ठाकरे कॉन्फरन्स अटेंड करणाऱ्या लोकांना कसे दिसत होते पहा. खाली आहे व्हायरल फोटो आणि शेजारी आहे व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये ते कसे दिसत होते त्याचा स्क्रीनशॉट. या दोन्हीला व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की भारतासह इतर देशांचे जे डाव्या बाजूचे झेंडे आहेत ते स्क्रीनशॉटमध्ये सुद्धा डावीकडेच आहेत. खिसा आणि पेन दोन्हीत उजवीकडेच आहे. वास्तवातली प्रतिमा अजिबात ‘मिरर ईमेज’ सारखी बदलली नाहीये.

comparison of real photo with VC screenshot
credit: twitter

त्यांच्या मिटिंगच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट आमच्याकडे कसा?

त्याच दिवशी रात्री ९.२२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हँडलवरून दुसरं एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये व्हिडीओ आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुंतवणूकदारांचे आभार मानत १६००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षरी झाल्याचे जाहीर करत आहेत. यात ते असेही सांगत आहेत की येत्या महिन्यात आणखी ३ गुंतवणूकदार दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की वास्तवातील फोटो आणि कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या प्रतिमेच्या क्वालिटी, कलर्स आणि वेबकॅम मुळे अँगलचा फरक आहे. परंतु सर्व गोष्टी जागच्या जागीच आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये भाजपा समर्थकांनी महाराष्ट्राच्या उलट्या नकाशाचा मुद्दा उचलला आहे तो सत्य निघाला. परंतु विरोध करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची पाटी सरळ कशी? म्हणत जी टीका केलीय त्याचा आरोप प्रत्यारोपांत काही संबंधच येत नाही कारण ती पाटी लॅपटॉपच्या समोर असल्याने कॉन्फरन्स मधल्या लोकांना दिसणारच नव्हती.

राहिला प्रश्न ठाकरे समर्थकांनी जी ‘मिरर ईमेज’सांगत पाठराखण केलीय ती सुद्धा तथ्यहीनच आहे कारण व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये समोरच्या व्यक्तीला सरळच चित्र दिसतं. हे असं नसतं तर प्रत्येक व्यक्तीला ऑफिशियल गोष्टींसाठी व्हिडीओ कॉन्फरन्स करताना मागे असणारी नावं, लोगो, नकाशे इत्यादी गोष्टी उलट्या छापून घ्याव्या लागल्या असत्या.

एकुणात काय तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण करताना ‘मिरर ईमेज’चे विज्ञान सांगणारे समर्थक ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत पूर्णतः चुकीचे असल्याचे आढळून आले आहे.

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा