Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदींची आजी वारल्यानंतर आईचा जन्म झाला? मोदींच्या माहितीत तथ्यांची गडबड?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने मोदींनी आईची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्या.

Advertisement

त्याच दिवशी म्हणजे १८ जून २०२२ रोजी ‘narendramodi.in’ या वेबसाईटवरून नरेंद्र मोदी यांनी आई विषयी एक ब्लॉग प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आई बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जडणघडणीत आई-वडिलांचा कसा वाटा आहे. त्यांच्या आईने कशा संकटांना धैर्याने तोंड दिले. कोवळ्या वयातच तिचे मातृछत्र कसे हरपले याविषयी हृद्य भावना मोदींनी या ब्लॉगमधून व्यक्त केल्या आहेत. परंतु यामध्ये त्यांनी दिलेली माहिती आणि सत्य परिस्थितीचे गणित काही जुळता जुळत नाहीये.

मोदींच्या आजीचे ‘स्पॅनिश फ्ल्यू’ महामारीत निधन:

“माझ्या आईचा जन्म गुजरातमधील मेहसाणा येथील विसनगर येथे झाला, जे माझे मूळ गाव वडनगरच्या अगदी जवळ आहे. तिला स्वतःच्या आईची ममता मिळाली नाही. लहान वयात तिने स्पॅनिश फ्लूच्या साथीने माझी आजी गमावली. तिला माझ्या आजीचा चेहरा किंवा तिच्या कुशीची उबही आठवत नाही. तिने तिचे संपूर्ण बालपण आईशिवाय घालवले. आपल्या सर्वांप्रमाणे ती तिच्या आईकडे हट्टही करू नाही शकली. आपल्या सर्वांप्रमाणे ती तिच्या आईच्या कुशीत बसू शकत नव्हती. तिला शाळेत जाऊन लिहिता-वाचायलाही शिकता आले नाही. तिचे बालपण गरिबी आणि वंचिततेत गेले.”

Narendra Modi's mentioned his grand mother's death due to spanish flue in his blog
Source: narendramodi.in/

‘स्पॅनिश फ्ल्यू’ महामारी १९१८ साली आली:

मोदींनी उल्लेख केलेल्या स्पॅनिश फ्ल्यू विषयी आम्ही माहिती मिळवली. मार्च १९१८ मध्ये अमेरिकेतल्या कान्सास शहरात ‘स्पॅनिश फ्ल्यू’चा पहिला रोगी सापडला. त्यांनतर ही साथ जगभरात पोहचली. या साथीत ५० ते १०० दशलक्ष लोक दगावले. यापैकी १२ ते १३ दशलक्ष भारतीय लोकांना आपला जीव गमवावा लागला.

Source: The Conversation

हेल्थलाईन या जर्नलनुसार १९१८ सालच्या सुरुवातीला आलेली ही ‘स्पॅनिश फ्ल्यू’ची साथ १८ महिन्यांत ओसरली. लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती तयार झाली. जीवितहानीचा धोका कमी झाला. १८ महिने म्हणजे दीड वर्षे. तरी साधारण १९१९ च्या शेवटापर्यंत साथीचा धोका जवळपास संपला होता असेच या माहितीतून समजतेय.

मोदींच्या आईचा जन्म १९२३ सालचा:

मातोश्री हिराबेन नरेंद्र मोदी यांच्या लहान भावाकडे पंकज मोदी यांचाकडे राहतात. इंडिया टुडेसोबत बोलताना पंकज मोदी यांनी सांगितले की “हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला होता. त्या येत्या १८ जून रोजी १०० व्या वर्षात पदार्पण करतील.” हेच औचित्य साधून गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी रायसन भागातील ८० मीटर रस्त्याला हिराबेन यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली. आता त्या रस्त्याचे नामकरण ‘पूज्य हिराबा मार्ग’ असे करण्यात आले आहे.

Heeraben Modi born on 18 June 1923
Source: India Today

नरेंद्र मोदी यांनी दिलेली माहिती आणि तथ्याचे गणित जुळत नाही:

नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आजीचा म्हणजेच आईच्या आईचा मृत्यू ‘स्पॅनिश फ्ल्यू’ महामारीमध्ये झाला. ही महामारी १९१८ साली आली होती. तिची तीव्रता साधारण १९१९ च्या शेवटापर्यंत ओसरली होती. जर हिराबेन मोदी यांच्या आईचा मृत्यू १९१८-१९ साली महामारीमध्ये झाला असेल तर १९२३ म्हणजेच तब्बल ४ ते ५ वर्षांनी त्या कशा जन्मास आल्या हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

टीप: सदर बातमीविषयी विश्वासार्ह स्रोतांकडून अधिक माहिती मिळाल्यास येथेच अपडेट करण्यात येईल.

हेही वाचा: अवघ्या काही वर्षांत मोदींचे नातेवाईक लक्षाधीश-अब्जाधीश झाल्याचे व्हायरल मेसेज फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा