सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पोलिसांची एक तुकडी बँकेचे शटर उघडून शिताफीने आतमधल्या काही लोकांना ताब्यात घेताना दिसतेय. या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट देखील होत असल्याचे बघायला मिळतेय.
सोशल मीडियावर दावा केला जातोय की अहमदनगर एमआयडीसी पोलिसांनी दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा टाकायला आलेल्या दरोडेखोरांना सिनेस्टाइलने पकडले आहे. बँक लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना ताब्यात घेतल्याबद्दल अहमदनगर पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये शेंडी गावात हा थरार रंगला असल्याचं सांगितलं जातंय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रा. संतोष साखरीकर आणि विजय चौधरी यांनी सदर व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि खरंच अशा प्रकारच्या दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओ शेंडी गावातील थराराचा असल्याचा उल्लेख आल्याने त्याच आधारे गुगलवर किवर्डसच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला ‘सामना’च्या वेबसाईटवर १ सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशित बातमी मिळाली.
- सामनाच्या बातमीनुसार ‘तीन चोरटे आले असून गावातील बँकेवर दरोडा पडलाय. चोरट्यांनी काळे जर्किन घातले असून बँक लुटण्याचा प्रयत्न सुरु आहे’ असा फोन ग्रामस्थांना आला. अवघ्या पाच मिनिटांच्या आत पाचशेच्यावर लोक बँकेसमोर गोळा झाले. पोलिसही आले व त्यांनी बँकेला घेरून चोरट्यांना पकडले.
- नगर तालुक्यातील शेंडी गावात हा थरार रंगला. मात्र ही खरी घटना नव्हती, तर पोलिसांनी नव्याने सुरु केलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक होते. सदरचा प्रकार हा पोलीस यंत्रणेचा सराव म्हणजेच ‘मॉक ड्रिल’ आहे हे समजले तेव्हाच ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.
- गावामध्ये दरोडा पडला किंवा नैसर्गिक आपत्ती व अन्य काही घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने संबंधित ठिकाणी पोहोचते हे पाहण्यासाठी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा योजना राबवली जात आहे. गावकरी व पोलिसांना एकाच वेळी घटना समजावी हा त्यामागील उद्देश्य आहे.
- हे ‘मॉक ड्रील’च असल्याचे महाराष्ट्र टाईम्स, लोकमत या दैनिकांनीसुद्धा आपल्या बातम्यांत स्पष्ट केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पोलिसांनी दरोडेखोरांना पकडल्याचा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ ही खरी घटना नसून पोलिसांचा सराव अर्थात ‘मॉक ड्रिल’ होते. सोशल मीडियावर हाच व्हिडीओ आता खऱ्या घटनेचा म्हणून व्हायरल होतोय.
हेही वाचा- सरफरोश स्टाईलने ढाब्यावर पकडलेला गुन्हेगार ‘मोहम्मद सिराज’ नव्हे ‘किशोर पांचाल’!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment