कोरोना महामारीच्या टाळेबंदीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. याचाच अनेकजण गैरफायदा घेताना दिसत आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’ने NPR नावाच्या कंपनीचे या आधी पितळ उघडे केले होते, असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. ‘महाराष्ट्र बांबू विकास मंडळ’च्या (Maharashtra bamboo development board) नावाखाली भरती (recruitment) प्रक्रियेच्या जाहिराती विविध माध्यमांत प्रकाशित झाल्या आहेत.
‘महाराष्ट्र शासन आदिवासी अनुसंधान प्रशिक्षण केंद्र व वनविभाग अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन व संशोधन केंद्र, बुटीबोरी, नागपूर’ यांच्या जाहिराती विविध नोकरी विषयक वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्सवर प्रकाशित झाल्या आहेत. या जाहिराती एखाद्या सरकारी विभागाची भरती (recruitment) प्रक्रिया असल्याचा भास निर्माण करत आहेत.
या पदांसाठी अर्जदारांकडून ५०० रुपये आवेदन शुल्क घेतले जात आहे.
सदर जाहिराती निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या (Maharashtra bamboo development board) व्यवस्थापकीय संचालकांनी जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीच्या मुख्य पुरवणीतील पान क्रमांक ४ वरील जाहिरात:
काय आहे जाहीर सूचना?
- सदर भरती प्रक्रियेच्या जाहिरातीसाठी नॅशनल बांबू मिशन, महाराष्ट्र बांबू विकास मंडळयांसारख्य केंद्र व राज्य शासनाच्या संस्थांशी साधर्म्य असलेल्या नावाचा वापर केला जातोय.
- तसेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर व बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चीचपल्ली चंद्रपूर या कार्यालयाच्या लोगोचाही वापर केला गेलाय.
- संबंधित कार्यालयाकडून नागपूरच्या गणेशपेठ आणि सोनेगाव या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर (Maharashtra bamboo development board) विभागामार्फत या फसव्या जाहिरातीला बळी पडून भरती करिता रक्कम सुद्धा देऊ नये असे आवाहन केले आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे आवाहन:
कोणत्याही शासकीय भरती प्रक्रियेच्या जाहिराती त्या संबंधीत विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उलब्ध असतात. शासकीय वेबसाईटच्या डोमेन नेम मध्ये ‘.gov’ म्हणजे असे एक्सटेन्शन असते. त्यामुळे येथून पुढे अशा कोणत्याही सरकारी विभागाच्या नावे भरती प्रक्रिया (recruitment) असल्याचे आढळल्यास अधिकृत वेबसाईटवर जाऊनच खात्री करावी.
हेही वाचा: मत्स्य व पशुधन विकास मंडळातील भरती प्रक्रियेच्या जाहिराती फेक, षडयंत्रास बळी पडू नका!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment