मत्स्य व पशुधन विकास मंडळ, के.वि के. महाराष्ट्र आणि एन. पी. आर. फीड & प्रोसेस प्रा. लि. यांच्या संयुक्त/ संलग्न उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पदभरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ‘बिझनेस कार्ड’ काढण्यासाठी ३२०० रुपये शुल्क भरण्यासाठीचे मेसेज संबंधित उमेदवारांच्या मोबाईलवर आले आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुयोग देशमुख यांनी मेसेजच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत पडताळणीची विनंती केली.
काय आहे मेसेज?
CONFIRMATION MESSAGE अभिनंदन!!! मत्स्य व पशुधन विकास मंडळ, के.वि के. महाराष्ट्र आणि एन. पी. आर. फीड&प्रोसेस प्रा. लि. यांच्या (Joint Venture) संयुक्त / संलग्न उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पदभरती साठी अर्ज मागवण्यात आले होते, त्यासाठी आपण प्रकल्प समन्वयक पदासाठी अर्ज केला होता, प्रकल्प समन्वयक पदासाठी आपण दिलेल्या टेलिफोनिक इंटरव्ह्यू द्वारे आपली निवड तात्पुरत्या स्वरुपात सहा महिने कालावधीसाठी करण्यात येत आहे. तरीही नियुक्तीसाठी कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे कुठल्याही कार्यलयात जमा करायची आवशक्यता नाही. तसेच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे इतर ठिकाणी काम करतांना देखील तुम्ही एन. पी. आर. चे काम करू शकतात, कुठल्याही प्रकारची कामावर हजेरी लावायची गरज नाही. सहा महिने झाल्यानंतर आपले कार्यकर्तुत्व पाहून आपणास कायमस्वरूपी करण्यात येईल. सदर पदासाठी आपले कार्य १५ ऑक्टोंबर २०२१ पासुन सुरु होईल. त्या संबधीचे कार्यप्रणाली आणि माहितीपत्रक (Brochures) हे आपल्याला ०५ ते १५ ऑक्टोंबर २०२१ या कालावधी दरम्यान पुरवण्यात येईल. कोरोना महामारीच्या संक्रमणापासून आपली सुरक्षितता लक्षात घेऊन आणि भविष्यात येणाऱ्या कुठल्याही महामारी दरम्यान आपले काम निरंतर, बिनदिक्कत, कुठल्याही अडचणी शिवाय सुरु राहावे यासाठी आपणास काम करण्यासाठी डिजिटल बिझनेस कार्ड (Digital Business Card) हा विकल्प निवडण्यात आला आहे, त्यासाठी एन. पी. आर. फिड&प्रोसेस प्रा. लि. ने नोझोमी (Nozomi) या कंपनीची निवड केली आहे. हे आपल्याला नोझोमी (Nozomi) या कंपनीच्या डिजिटल बिझनेस कार्ड (Digital Business Card) द्वारे पुरवण्यात येईल. त्यासाठी आपणास तिथे सशुल्क(रु.३२००/-) त्यांच्या नियम व अटींच्या अधून राहून कार्ड घेणे बंधनकारक आहे. डिजिटल बिझनेस कार्ड (Digital Business Card) घेतांना सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घेणे. नोझोमी संकेतस्थळ (Nozomi Website) : www.nozomiindia.com कार्ड कसे तयार करावे? (How to Register and Creat Digital Business Card) हे संकेतस्थळावर बघावे. आपण जर नोझोमी (Nozomi) चे डिजिटल बिझनेस कार्ड (Digital Business Card) दिलेल्या मुदतीत १० ऑगस्ट २०२१ ते १६ ऑगस्ट २०२१ या दरम्यान घेतले तरच ह्या पदासाठी तुम्ही पात्र असाल. तसेच कार्ड घेतल्यानंतरचा रेफरल आय. डी. (Referral ID) संभाळून ठेवावा, तसेच तो रेफरल आय. डी. (Referral ID) एन. पी. आर. टीम कडे व्हॉट्सऍप द्वारे पुढील प्रक्रीयेसाठी (जसे की वेतन, बँक तपशील आणि इतर सुविधा) नमूद करावा. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे कार्यालय आणि फोनकॉल सुविधा बंद राहतील, व्हॉट्सऍप व मेल द्वारे सहकार्य करण्यात येईलयाची नोंद घ्यावी.
दैनिक दिव्य मराठी, लोकमत यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांत या भरतीप्रक्रियेच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.
पडताळणी:
उमेदवारांना आलेला मेसेज व्यवस्थित वाचला असता असे लक्षात आले की एनपीआर समोर ‘प्रायव्हेट लिमिटेड’ असे आहे म्हणजे ती खाजगी कंपनी आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाचा कुठला विभाग भरती प्रक्रिया अशा त्रयस्थ कंपनीकडे का देईल? काँट्रॅक्ट बेसिसवर जरी ही भरती प्रक्रिया असती तरीही जाहिरात देताना संबंधित खाजगी कंपनीचा उल्लेख नसता किंवा तो अगदी शेवटी छोट्या अक्षरात असता. मुळात अशा भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडूनच पैसे घेण्याचा प्रकार म्हणजे शंकास्पद आहे. या सर्व प्रश्नांसह आम्ही पडताळणी सुरु केली त्यात जे गवसलं ते पुढीलप्रमाणे:
- मत्स्य व पशुधन विकास मंडळ या शासकीय विभागाच्या वेबसाईटवर सदर भरती प्रक्रियेविषयी माहिती असेलच या अंदाजाने आम्ही शोधाशोध केली असता अशा नावाचा कोणताही विभाग अस्तित्वात नसल्याचे समोर आले.
- महाराष्ट्र राज्याचा ‘महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ’ या नावे एक विभाग आहे. त्याच्या अधिकृत वेबसाईटवरून अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला असता पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. नितीन फुके यांनी सविस्तर माहिती दिली.
मुळात आपल्या राज्य सरकारचा ‘मत्स्य व पशुधन विकास मंडळ’ नावाचा कोणताही विभाग नाही. आमच्या विभागाच्या नावात ‘मत्स्य’ नाही. किंबहुना आमच्या विभागाने अशा कोणत्याही खाजगी कंपनीशी संलग्न होऊन भरती प्रक्रिया राबविली नाही. सध्या तरी आमच्या विभागाची कुठलीही भरती प्रक्रिया सुरु नाही. जर असती तर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर या संबंधी जाहिरात प्रकाशित केली असती.
मागे काही महिन्यांपूर्वी देखील अशाच फ्रॉड कंपनीने जाहिराती दिल्या होत्या. माझी आपल्या मार्फत सर्व उमेदवारांना विनंती आहे की आपल्या फसवणुकीची रीतसर पोलिस तक्रार दाखल करा. आवश्यक ती मदत आमचा विभाग नक्की करेल.
– डॉ. नितीन फुके (उपायुक्त पशुसंवर्धन, म.प.वि.मं मुख्यालय,नागपूर)
- एनपीआर कंपनीच्या वेबसाईटवर ‘मत्स्य व पशुधन विकास मंडळ’सह ‘केव्हीके’ सोबतही संलग्नता असल्याचे लिहिले आहे. केव्हीके म्हणजे ‘कृषी विज्ञान केंद्र’. देशभरात असे ७२२ केंद्र आहेत. हे स्थानिक कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येतात. यांपैकी नेमक्या कोणत्या कृषी विज्ञान केंद्राशी या एनपीआर कंपनीची संलग्नता आहे हे देखील वेबसाईटवर नमूद केलेले नाही.
- वेबसाईटवर ‘नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड’, नाबार्ड, नाफेड, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, अमूल अशा राष्ट्रीय विभाग आणि सहकार कंपनीच्या लोगोंचा समावेश आहे. परंतु कायद्यात अडकू नये यासाठी तेथे केवळ ‘आमचे प्रेरणास्थान’ असे लिहिले आहे.
- वेबसाईटवर ‘निवड झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना अत्याधुनिक साधनांद्वारे विनामूल्य / मोफत प्रशिक्षण देण्यात येईल, त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही .’ असे लिहिले आहे आणि निवडलेल्या उमेदवारांना बिझनेस कार्ड काढण्यासाठी ३२०० रुपये शुल्क मोजावे लागतील असे मेसेज पोहोच झाले आहेत. दोन्ही बाबी परस्परविरोधी आहेत.
- वेबसाईटवर कुठेही त्या बिझनेस कार्ड बनवून देणाऱ्या ‘नोझोमी इंडिया’ या वेबसाईटचा उल्लेख नाही.
- जर ‘नोझोमी इंडिया’चा ‘एनपीआर फीड अँड प्रोसेस प्रा. लि.’ सोबत काहीएक संबंध नाही तर संबंधित उमेदवारांना मेसेज गेले कसे? भलत्याच कुठल्या कंपनीकडे उमेदवारांचे मोबाईल नंबर्स कसे पोहचले? या प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी आम्ही दोन्ही कंपन्याना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दिलेले फोन नंबर्स बंद आहेत. अगदी ईमेल आणि व्हॉट्सऍपवरही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
- कंपनीने नव्याने अपडेट केल्यानुसार ‘मत्स्य व पशुधन विकास मंडळ आणि के.व्ही.के’ या खाजगी आस्थापना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु या दोन्ही संस्थांची नेमकी कुठे नोंद आहे याचे पुरावे उपलब्ध नाहीत.
- ‘NPR FEED & PROCESS PRIVATE LIMITED’ या खाजगी कंपनीच्या नावाने २२/०६/२०२० रोजीचे म्हणजेच अवघ्या वर्षभरापूर्वीचे MCA कडे रजिस्ट्रेशन आहे. निलेश खांडेकर आणि रुपेश कचरू सरग ही नावे संचालक यादीमध्ये आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या प्राथमिक पडताळणीमध्ये ‘एनपीआर फीड अँड प्रोसेस प्रा. लि.’ या कंपनीने जारी केलेली जाहिरात, भरती प्रक्रिया आणि त्यांची ‘नोझोमी’ नावाच्या कंपनीसोबत असणारी छुपी संलग्नता मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.
उमेदवारांनी कोणत्याही ठिकाणी नोकरीविषयक अर्ज करताना संबंधित कंपनी अथवा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर चौकशी करावी. तसेच कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी, कोणत्याही कारणासाठी पैसे भरण्याची गरज नाही हे लक्षात ठेवावे.
(टीप: कंपनीद्वारे काही स्पष्टीकरण आल्यास येथेच अपडेट केले जाईल.)
अपडेट: ‘चेकपोस्ट मराठी’च्या बातमीनंतर एनपीआर प्रोसेस कंपनीने वेबसाईटवर नवी माहिती अपडेट केली आहे. त्यात ‘नोझोमी इंडिया’या बिझनेस कार्ड देणाऱ्या कंपनीचा उल्लेख केला आहे. तसेच मत्स्य व पशुधन विकास मंडळ आणि के.व्ही.के या खाजगी आस्थापना असल्याचाही उल्लेख त्यात आहे. कंपनी ‘कुठल्याही प्रकारची सरकारी सेवा, सरकारी लाभ, सरकारी योजना, यांचे लोभ / प्रलोभन देत नाही‘ असाही स्पष्टपणे उल्लेख आहे.
परंतु या कंपनीने ‘चेकपोस्ट मराठी’च्या प्रश्नांना अजूनही उत्तर दिले नाही. तसेच मत्स्य व पशुधन विकास मंडळ आणि के.व्ही.के या खाजगी आस्थापना असल्याचे कुठलेही पुरावे दिले नाहीत. त्याचप्रमाणे बिझनेस कार्डसाठी ३२०० रुपये देणे गरजेचे असल्याचा उल्लेखही वेबसाईटवर केला नाही.
कंपनीचे अधिकृत ओळखपत्र असल्यास आणि आपली नोकरी अत्यावश्यक सेवेच्या चौकटीत बसत असेल तर अगदी टाळेबंदीच्या काळात देखील आपली कायदेशीररीत्या अडवणूक करण्याचा संबंध येतच नाही. त्यामुळे ‘बिझनेस कार्ड’च्या नावाखाली प्रत्येकी ३२०० रुपये गोळा करण्याची बाब शंकास्पदच आहे.
उमेदवारांनी या ‘खाजगी’ कंपनीच्या नोकरीवर विश्वास ठेऊन ३२०० रुपये भरावेत की नाहीत हे स्वतःच्या जबाबदारीवर ठरवावे.
हेही वाचा: रेल्वे खात्यात वेल्डर पासून कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ५२८५ जागांवर भरतीची जाहिरात फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]