मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच वातानुकुलीत डबल डेकर बसेस धावताना बघायला मिळणार आहेत. बेस्टच्या 900 पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि प्रदूषणमुक्त डबल डेकर बस खरेदीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटरवरून दिली. सोबतच त्यांनी बेस्टच्या डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा (Best electric double decker bus) म्हणून एका लाल डबल डेकर बसचा फोटो देखील ट्विट केलाय. या बसवर ‘बेस्ट’ असं लिहिलेलं देखील बघायला मिळतंय.
पडताळणी:
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरण्यात आलेला फोटो रिव्हर्स इमेजचा साहाय्याने शोधला असता Clonedoner92 या परिवहन क्षेत्राशी संबंधित लेख आणि व्हिडीओ संदर्भातील ब्लॉगवर 3 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध लेखामध्ये हा फोटो बघायला मिळाला.
व्होल्वोकडून बर्मिंगहॅममधील युरो बस एक्स्पोमध्ये B5LHC डबल-डेक इलेक्ट्रिक बसचे अनावरण केल्याची माहिती या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे.
याच माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता व्होल्वोच्या वेबसाईटवर 2016 सालच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये हा फोटो बघायला मिळाला. 2014 साली सुरुवात करण्यात आलेल्या व्होल्वो 7900 सिंगल डेक इलेक्ट्रिक बसला मिळालेल्या यशानंतर कंपनीकडून व्होल्वो B5LHC डबल डेक बसची सुरुवात करण्यात आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
व्होल्वोच्या B5LHC डबल डेक बसचे इतरही अनेक फोटोज गुगलवर उपलब्ध आहेत. या बसेस प्रामुख्याने लाल आणि हिरव्या रंगात असल्याचे आम्हाला बघायला मिळाले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा म्हणून शेअर केलेला फोटो हा व्होल्वोच्या B5LHC डबल-डेक बसचा आहे. व्होल्वोकडून 2016 साली बर्मिंगहॅममधील युरो बस एक्स्पोमध्ये या बसचे अनावरण करण्यात आले होते.
हेही वाचा- सरसंघचालक मोहन भागवत आणि असदुद्दिन ओवैसी मांडीला मांडी लावून बसले? वाचा सत्य!
Be First to Comment