ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे 2 फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस होता. यावेळी त्यांना आपल्या मृत्यची चाहूल लागली होती म्हणून त्यांनी पत्नी सीमा देव (Seema Deo) यांच्याकडे शेवटची इच्छा बोलून दाखवल्याच्या दाव्यासह एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘आभिनेते रमेश देव यांचा वाढ दिवस निधनापुर्वी दोन दिवस अगोदर झाला होता. त्यांनी आपल्या सुविध्य पत्नी सीमा देव यांना मृत्यूची चाहूल लागल्या बाबत कसे बोलले. प्रत्यक्ष पाहा’ अशा मजकुरासह टीव्ही 9 मराठी वाहिनीचा 1.08 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला जातोय.
फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सऍपवरही अनेक ग्रुप्समध्ये हा व्हिडीओ शेअर केला गेलाय.
पडताळणी:
रमेश देव यांचा जन्मदिवस 30 जानेवारी रोजी असतो. म्हणजेच मृत्युच्या 2 दिवसांपूर्वी त्यांचा जन्मदिन होऊन गेला होता. परंतु व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा तपासत असताना ‘टीव्ही 9 मराठी’च्या अधिकृत चॅनलवर 13 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘टीव्ही 9 मराठी’ने अभिनेते रमेश देव आणि त्यांची पत्नी सीमा देव यांची मुलाखत आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या 2.07 मिनिटांच्या पुढे रमेश देव, सीमा यांना आपली इच्छा बोलून दाखवत आहेत. याच व्हिडीओचा कट केलेला भाग सध्या व्हायरल होतोय.
याची शहानिशा न करता शेअर करणारे करणारे जबाबदार आहेतच, परंतु लोकांची दिशाभूल करण्यासाठी ‘टीव्ही 9 मराठी’ स्वतः जास्त जबाबदार आहे. ‘टीव्ही 9 मराठी’कडून रमेश देव यांचे निधन झाल्यानंतर वाहिनीने जुन्या व्हिडीओचा एडिटेड भाग कट केला. त्यावर खालच्या कोपऱ्यात ‘संग्रहित’ असे लिहिले परंतु नेमका कधीचा व्हिडीओ याविषयी माहिती न देता यावरच 3 फेब्रुवारी 2022 अशी तारीख टाकली आणि स्वतःच्या अधिकृत युट्युब चॅनलवर तो एडीट केलेला व्हिडीओ अपलोड केला. कहर म्हणजे त्यास तुझ्या ‘मांडीवरती श्वास सोडावा’ Ramesh Deo यांना मृत्यूची चाहूल?’ असे कॅप्शनही दिले.
रमेश देव यांच्या वयाविषयी संभ्रम:
देव यांच्या चाहत्यांची दिशाभूल करणारा अजून एक भाग म्हणजे त्यांचे वय. 2019 सालच्या ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीमध्ये ते स्वतः ‘आता मी 93 वर्षांचा झालो’ असे म्हणतायेत. ‘टीव्ही 9 मराठी’ने त्याच 2019 साली रमेश देव यांच्या जन्मदिनानिमित्त स्पेशल रिपोर्ट देखील केला होता.
परंतु आता त्यांच्या निधनानंतर सर्वत्र बातम्या प्रसारित होताना ते ’93’ वर्षांचे होते असेच सांगितले आहे. अनेक ठिकाणी त्यांची जन्मतारीख 30 जानेवारी 1929 अशीच दिसतेय. या हिशोबने त्यांचे 92 वर्षे पूर्ण झाले आणि 93 व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले होते. त्यांच्या वयाविषयी आम्ही स्वतंत्ररित्या नेमकी पडताळणी करू शकलो नाही, परंतु व्हायरल होत असलेला व्हिडीओ 3 वर्षे जुना आहे एवढे मात्र खरे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की दिवंगत अभिनेते रमेश देव यांना शेवटच्या वाढदिवशी आपल्या मृत्यूची चाहूल लागल्याचे दर्शवणारे दावे फेक आहेत. ज्या व्हिडीओच्या आधारे हे दावे केले जातायेत तो व्हिडीओ 2019 साली शूट केला गेलाय.
हेही वाचा: अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राच्या बातमीत मिडियाने वापरला अभिनेता ‘उमेश कामत’चा फोटो!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment