Press "Enter" to skip to content

‘आई म्हणजे आई असते; पण एकसाथ सर्वांची ‘सेम’ असते?’ काय विनोदी घडलंय वाचा…

कवी यशवंत यांची एक कविता फार प्रसिद्ध आहे ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी’. खरंतर ही कविता करुण रसातली आहे. वाचणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल अशी. परंतु आज एक असा किस्सा घडल्याचा दावा होतोय की त्यातून या कवितेचं ‘आई म्हणोनी कोणी दुसऱ्याच्या आईस हाक मारी’ असं कुणालातरी विडंबन सुचावं.

होय, फेसबुक-व्हॉट्सऍप सारख्या माध्यमांतून काही दावे समोर येत आहेत.

काय आहेत दावे?

‘सगळ्यांच्या मातोश्रींची तब्येत वाईट आहे. या भारतमाता असाव्यात ! काहीही सुरू असो यांचा प्रपोगंडा थांबत नाही.’

Advertisement

असं कॅप्शन लिहित फेसबुक युजर श्रीरंजन आवटे यांनी ट्विटरवरील वेगवेगळ्या लोकांच्या पोस्ट्सचे स्क्रिनशॉट शेअर केलेत. सर्वच ट्विट्स मधील मजकूर आणि फोटोज एकसारखे आहेत.

“मी नरेंद्र मोदीजींचे लाइव्ह भाषण पहात आहे, त्यांनी आपल्या जवानांसाठी २ मिनिट उभं रहायला सांगितलं आणि बघा काय चमत्कार झाला? मला माहित नाही पण मी एवढा भावनिक का झालो कारण माझ्या आईला अजिबात बरं नाहीये, तिला साधं उभंही राहता येत नाही नीटसं पण ती…” सोबत मोदींचे टीव्हीवर भाषण चालू असल्याचा एक फोटो आणि शेजारी उभी राहून हात जोडलेल्या आईचा फोटो.

असा एकच मजकूर आणि एकसारखेच फोटो असलेले ५ स्क्रीनशॉट या पोस्ट मध्ये आहेत.

Shriranjan Awate FB post
Credit: facebook

अशीच पोस्ट फेसबुक युजर ध्रुव राठी यांनी देखील टाकली आहे. ही पोस्ट आम्ही स्क्रिनशॉट घेतला त्यावेळी  ५ हजारच्या वर लोकांनी शेअर केली होती.

dhruv rathee fb post
credit: facebook

पडताळणी:

१७ जून २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील  तणावाबद्दल देशासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं. या दरम्यान त्यांनी नागरिकांना जवानांच्या योगदानासाठी दोन मिनिट उभं राहून अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं.

त्याच अनुषंगाने सोशल मीडियात अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली होती. परंतु दाव्यात सांगितल्याप्रमाणे एकच मजकूर आणि एकसारखे फोटो म्हणत अनेकांनी शेअर केले आहेत की नाहीत याची पडताळणी करणे आवश्यक होते.

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी ट्विटरवर जाऊन व्हायरल पोस्टमधील स्क्रिनशॉटवर असणाऱ्या मजकुराचे पहिले तीनचार शब्द सर्च करून पाहिले.

हे एवढे ट्विट्स सापडले ज्यांचा मजकूर आणि फोटोज एकसारखेच होते.

kolaj of viral tweet content and pics
credit: twitter

गंमत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका (अर्थात) फेक अकाऊंटवरून सुद्धा हाच मेसेज आम्हाला दिसला.

या सर्व ट्विट्स पैकी काही मोजके ट्विट्स असे होते की ज्यात मूळ ट्विट असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख होता. त्यांनी आपल्या आईसोबत घडलेला हा प्रसंग असल्याचं न सांगता प्रामाणिकपणे मूळ पोस्टकर्त्या व्यक्तीचे नाव दिले होते.

प्रेरणा असं त्या मूळ पोस्टकर्तीचं नाव. त्यांनी हे ट्विट शेअर केलं होतं आणि आपल्या आईचे फोटोज टाकले होते.

अनेकांनी प्रेरणा यांच्या ट्विटबद्दल सुद्धा शंका विचारली तेव्हा मग त्यांनी दुसरे एक ट्विट करून आईसोबतचे इतरही काही फोटोज टाकून स्पष्टीकरण दिलं.

अनेकांनी व्हायरल कॉपी पेस्टेड ट्विटमुळे प्रेरणा यांच्याच मूळ ट्विटवर शंका उपस्थित करून ट्रोल केल्यामुळे त्यांनी आणखी एक ट्विट करत ‘मला एक कळत नाहीये, लोकांनी माझं ट्विट आणि माझ्या आईचा फोटो कॉपीच का केला असेल पण?’ असं लिहून ‘फालतूमें ट्रोल कर दिया’ म्हणत स्वतःचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालंय सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले दावे खरे आहेत. पंतप्रधानांच्या समर्थकांनी प्रेरणा यांचे मूळ ट्विट कॉपी पेस्ट केले आहे. स्वतःची आई म्हणत प्रेरणा यांच्या आईचे फोटोज आहे असेच लावले आहेत.

या कॉपी पेस्ट करणाऱ्या ट्विटर हँडल्सच्या नावांकडे पाहिल्यावर ते फेक असावेत असाही प्राथमिक अंदाज आहेच. हा खोडसाळपणा आहे की पंतप्रधान मोदींच्या भाषण कौशल्याची स्तुती करण्यासाठी IT सेलने राबवलेला प्रोपोगंडा हे कळायला मात्र मार्ग नाही.

हेही वाचा:
जैन मुनींच्या स्वागतासाठी मोडले सोशल डीस्टन्सिंगचे नियम, व्हायरल्सचा दावा खरा

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा