Press "Enter" to skip to content

अर्जुन देशपांडे यांच्या कंपनीचे ५०% शेअर्स टाटांनी घेतले नाहीत. एबीपी, भास्करच्या बातम्या चुकीच्या

अर्जुन देशपांडे नावाच्या सतरा वर्षीय मराठी तरुणाची ‘जेनेरिक आधार’ ही स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते.

Advertisement

अर्जुन देशपांडे या मराठी तरुणाची धडपड पाहून रतन टाटा यांनी वैयक्तिक पातळीवर एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के एवढी रक्कम अर्जुन देशपांडेला देऊ केलीय. असा दावा ‘इंडिया टुडे’, ‘एबीपी माझा’ यांसारख्या नामांकित वृत्त वाहिन्यांनी, तसेच ‘दैनिक भास्कर’ सारख्या वृत्तपत्राने केलाय. यात ‘बिझनेस टुडे’, ‘न्यूज एक्स्प्रेस’, ‘वन इंडिया हिंदी’ यांसारख्या पोर्टल्सचा सुद्धा समावेश आहे.

पडताळणी:

रतन टाटा यांनी या तरुणाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे की नाही? किती टक्के केली आहे याची सर्वात अधिकृत माहिती स्वतः रतन टाटा यांच्याशिवाय कोण सांगणार? म्हणून आम्ही टाटा याविषयी कुठे काही बोलले आहेत का हे तपासले. टाटा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याविषयी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यावर असं लिहिलंय की “मला या उपक्रमाला पाठबळ देण्यात नक्कीच आनंदी आहे. पण ही गुंतवणूक फार छोटी आहे. मी ५० टक्के भागीदारी घेतलेली नाहीये.”

टाटांनी आपल्या ट्विटमध्ये अफवांवर पडदा टाकला पण मग हि ५० टक्क्यांची बातमी नेमकी आली कुठून हे तपासण्यासाठी आम्ही अर्जुन देशपांडे हे असं कुठे काही बोलला आहे का हे तपासून पाहिले. ‘ETNOW’ या वाहिनीवर त्याने दीर्घ मुलाखत दिली आहे पण यातही तो कुठे असं काही म्हणाला नाही. आम्ही जेव्हा ABP माझाची बातमी पाहिली तेव्हा त्यांनी त्यात अर्जुनच्या ‘जेनेरिक आधार’ कंपनीच्या नावे असणाऱ्या फेसबुक पेजचा उल्लेख केलेला आढळला. त्या पेजवर जाऊन आम्ही पाहिलं. तिथे त्यांनी सर्व माध्यमांसाठी एक प्रेस रिलीज दिलं आहे. त्या पानभर प्रेस रिलीज मध्ये टाटा यांच्या गुंतवणुकीबद्दल माहिती आहे पण यात कुठेही विशिष्ट रकमेचा किंवा टक्केवारीचा उल्लेख नाही.

 

वस्तुस्थिती:

रतन टाटा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या स्पष्टीकरणातून आणि अर्जुन देशपांडेच्या ‘जेनेरिक आधार’ या फेसबुक पेजवरील निवेदनातून हे लक्षात आलं की टाटा यांनी कंपनीत काही गुंतवणूक केली आहे हे नक्की; परंतु ती गुंतवणूक ५० टक्के एवढी नाही.

इंडिया टुडे, एबीपी माझा यांसारख्या नामांकित वृत्त वाहिन्यांनी, दैनिक भास्कर सारख्या वृत्तपत्राने बिझनेस टुडे, न्यूज एक्स्प्रेस, वन इंडिया हिंदी यांसारख्या पोर्टल्सने केलेला टाटांच्या ५०% गुंतवणुकीचा दावा वाचकांची  दिशाभूल करणारा आहे. या अशा तथ्यहीन दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वरच निकालात काढत आहोत.

हे ही वाचा- रतन टाटांच्या नावाने उद्योजकांना देण्यात आलेला उभारीचा संदेश फेक!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा