सध्या सोशल मीडियावर ‘हर हर शंभू’ हे शिव भजन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतेय. श्रावण महिन्यात अनेकांच्या मोबाईलमध्ये हे भजन ऐकायला मिळतेय. हे भजन अभिलिप्सा पांडा (Abhilipsa Panda) या गायिकेने सर्वप्रथम गायले होते. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी हे भजन रिलीज झाल्यानंतरच्या काही दिवसांमध्येच ते खूप व्हायरल झाले होते.
‘हर हर शंभू’चेच फरमानी नाझ (Farmani Naaz) या मुस्लिम गायिकेने गायलेले व्हर्जन देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. यानिमित्ताने अनेक विवाद देखील निर्माण झाले आहेत. मुस्लिम मौलवींनी यासंदर्भात आक्षेप नोंदविलेला असतानाच अभिलाषा पांडा या नावे चालविल्या जाणाऱ्या ट्विटर हँडल्सवरून फरमानी नाझवर गाणे चोरल्याचा आरोप केला आहे. एक मुस्लिम मुलगी आपले श्रेय लाटत असल्याचे अभिलाषा पांडा हिने म्हंटले आहे.
पडताळणी:
आम्ही सर्वप्रथम व्हायरल ट्विट ज्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे, ते हॅण्डल तपासण्याचा प्रयत्न केला असता हे अकाउंट तात्पुरते प्रतिबंधित करण्यात आले असल्याचे बघायला मिळाले. शिवाय हे अकाउंट अभिलाषा पांडा या नावाने आहे, तर हर हर शंभू गाणाऱ्या गायिकेचे नाव ‘अभिलिप्सा’ आहे.
त्यानंतर आम्हाला ‘अभिलिप्सा पांडा’ हीने एबीपी न्यूज या वाहिनीला दिलेली मुलाखत बघायला मिळाली. या मुलाखतीत अभिलिप्सा हीला विचारण्यात आले होते की ‘हर हर शंभू’चे अनेकांकडून रिमिक्स व्हर्जन बनविले जाताहेत. अनेक गायक हे भजन गाताहेत. फरमानी नाझनेही ते गायले आहे. यावर तीला काय वाटते?
या प्रश्नाच्या उत्तरात अभिलिप्सा म्हणते की लोकांकडून एवढं प्रेम मिळतंय, याचा खूप आनंद आहे. आता हे गाणे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित राहिलेले नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन बंधू भगिणींकडून देखील या भजनास पसंती मिळतेय. हे भजन कुणीही गायलं, तर त्याचा आनंदच होतो. मग तो कुठल्याही धर्माचा असो.
पडताळणी दरम्यान आम्हाला ट्विटरवर अभिलिप्सा पांडाचे खरे अकाउंट देखील बघायला मिळाले. या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की ते अभिलिप्साचे अधिकृत अकाउंट असून बाकी सर्व अकाउंट फेक आहेत. कृपया सतर्क रहा.
आम्हाला अभिलिप्साच्या याच अकाऊंटवरून फरमानी नाझ संदर्भातील व्हायरल ट्विटवर कॉमेंटच्या रूपात देण्यात आलेली प्रतिक्रिया देखील बघायला मिळाली. यामध्ये अभिलिप्साने नाझबद्दल कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय ट्विट करणाऱ्याला देखील अशा प्रकारची भाषा न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. ‘हर हर शंभू’ गाण्याच्या मूळ गायिकेने फरमानी नाझवर गाणे चोरल्याचा आरोप केलेला नाही. शिवाय फरमानी नाझ हीने देखील ‘हर हर शंभू’ आपले गीत असल्याचा दावा कधीही केलेला नाही.
हेही वाचा- मुस्लीम महिलांनी दुबईत राम भजन गायले का? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]