मतदान कक्षात एकामागून एक नागरिक येत आहेत, परंतु ईव्हीएम मशीनजवळ उभा राहिलेला पोलिंग एजंट स्वतःच त्यांच्या नावे मत देतोय. विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांची या सर्व प्रकारास मूक संमती असल्याचे दिसतेय. सदर प्रकार उत्तर प्रदेश निवडणुकांतील असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
अखिलेश यादव, बसपा, आम आदमी पार्टी यांच्याशी संबंधित ट्विटर हँडल्सला मेन्शन करून हा व्हिडीओ ट्विट केला गेलाय, चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई करण्याची सूचना देखील केली आहे.
ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर सदर व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक पोपट शेळके आणि सुभाष तोडकर यांनी सदर व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले. दोन-तीन वेळा व्यवस्थित ऐकल्यानंतर त्यात बोलली जाणारी भाषा हिंदी नसून बंगाली असल्याची जाणवली.
‘इनव्हिड’च्या मदतीने व्हिडीओच्या की फ्रेम्स गुगल सर्च करून पाहिल्या असता २७ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित ‘टीव्ही९ बंगाल’ची बातमी आम्हाला सापडली.
बातमीनुसार बंगाल मधील महानगरपालिका २०२२च्या निवडणुकीतील हा व्हिडीओ आहे. ‘लेक व्ह्यू स्कूल’ बूथ क्रमांक १०६ मध्ये घडलेल्या प्रकाराचे ते चित्रण आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्हिडीओतील व्यक्ती तृणमूल कॉंग्रेसचा असल्याचा आरोप केलाय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत नेमक्या कुणाच्या फायद्यासाठी हा मतदानाचा काळाबाजार चालू होता, याविषयी स्पष्ट माहिती मिळाली नाही परंतु या व्हिडीओचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांशी काहीएक संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. सदर व्हिडीओ पश्चिम बंगालचा आहे.
हेही वाचा: वडापाव फुकट न दिल्याने शिवसेना नेत्याची दुकानदारास मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment