अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर नवनवे कायदे केले जातायेत. आता मोबाईल वापरावरच बंदी आणलीय. नागरिकांनी मृत्युच्या भीतीने सैनिकांकडे मोबाईल जमा केले असल्याचे दर्शवत मोबाईलच्या ढिगाऱ्यात उभ्या सैनिकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.
‘मोबाइल फोन अब अफगानिस्तान में प्रतिबंधित हैं। सभी को स्वेच्छा से अपने मोबाइल तालिबान सेना के अधिकारियों को सौंपने होंगे। इसके बाद, मोबाइल के साथ पाए जाने वाले किसी भी व्यक्ति को मौत की सजा का सामना करना पड़ेगा, यह अफगानिस्तान में नया कानून है’ अशा मजकुरासह २१ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड, शैलेश चौधरी आणि बाळू वैराळ यांनी फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर सैनिकाच्या दंडावर पाकिस्तानचा झेंडा आम्हाला दिसला.
पाकिस्तानचा व्हिडीओ असल्याची शंका आल्याने त्यानुसार आम्ही गुगलसर्च केले असता ‘Karachi News 21‘ या फेसबुक पेजवरील बातमी सापडली. यातील दृश्ये आणि व्हायरल व्हिडीओतील दृश्ये तंतोतंत जुळणारी आहेत.
बातमीची उर्दू कॅप्शन आम्ही ट्रान्सलेट करून पाहिली तेव्हा असे समजले की हे ‘सीमाशुल्क विभागाचे जवान आहेत. तस्करी होत असलेला माल त्यांनी पकडला होता. या कारवाईत त्यांना २४९ किलो ड्रग्ज, ५५००० दारूच्या बाटल्या, तंबाखू, सिगारेट आणि मोबाईल फोन्स मिळाले. हा सर्व जप्तीचा माल त्यांनी नष्ट करून टाकला. तब्बल २.४७ अब्जाहून अधिक किमतीचा हा माल होता असेही बातमीत सांगितले आहे.
अफगाणिस्तानमध्ये मोबाईल बंदी?
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बातम्या देणाऱ्या गंधारा न्यूजच्या ४ ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांना विशेषतः युवकांना काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल फोन वापरू नयेत, दाढी कमी करू नये, टाईट कपडे घालू नये, मोबाईलवर संगीत ऐकू नये अशा सूचनांचा समावेश आहे.
तेथील काही पत्रकार आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांनुसार तालिबान्यांना नागरिकांचा जगाशी संपर्क तोडायचा आहे म्हणून हे सर्व प्रयत्न आहेत. तर तालिबानी सरकारच्यामते मोबाईल फोनमुळे युवा पिढी बरबाद होतेय. त्यांच्यावर ‘चांगले संस्कार’ होण्यासाठी हे पाउल उचलले गेले आहे.
ज्यांचे नातेवाईक विदेशात आहेत त्यांना व्हिडीओ कॉलसाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे, परंतु तालिबान सरकारने त्यांनाही स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातलीय. साधे केवळ कॉल करता येण्यासारख्या मोबाईल फोन वापरण्याची मुभा आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की तालिबान्यांनी अफगाण नागरिकांच्या मोबाईल वापरावर निर्बंध लावल्याची बाब खरी आहे, परंतु व्हायरल होत असलेला व्हिडीओ अफगानिस्तानचा नसून पाकिस्तानचा आहे. तस्करी केला जात असलेला बेकायदेशीर माल जप्त करून तो नष्ट करणाऱ्या सीमाशुल्क विभागाच्या सैनिकांचा तो व्हिडीओ आहे.
हेही वाचा: संजय राऊत यांनी ‘तालिबान लोकशाहीवर चालणारा’ असे वक्तव्य केले नाही, ‘TV9’ची बातमी फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment