सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये आकाशाकडे झेप घेणारे रॉकेटसदृश्य चक्रीवादळ बघायला मिळतेय. व्हिडिओमध्ये हे दृश्य बघून आश्चर्यचकित झालेल्या कुठल्याश्या व्यक्तीचा आवाज देखील ऐकायला मिळतोय. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील असल्याचे सांगितले जातेय.
अलाहाबादच्या संगमावर गंगेतून ढगांचे पाणी वाहून नेले जात असतानाचे हे अद्भुत पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याच्या दाव्यासह हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता 9 जून 2018 रोजी दैनिक सकाळच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आले असल्याचे बघायला मिळाले.
फेसबुक पोस्टच्या डिस्क्रिप्शननुसार व्हिडीओ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील रानमळा येथील नाझरे धरणातील पाण्यात आलेल्या चक्रीवादळाचा आहे. नाझरे धरणातील पाणी आकाशाकडे खेचले गेले होते. आकाशात झेपावणाऱ्या रॉकेटप्रमाणे ते भासत होते. रानमळा व परिसरातील ग्रामस्थ, तसेच धरणावरील पर्यटकांनी पाण्याचे हे वादळ मोबाईलमध्ये टिपल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
‘सकाळ’च्या वेबसाईटवर देखील यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सकाळच्या बातमीनुसार नाझरे धरणाचे पाणी रानमळ्यापर्यंत पसरले होते. सायंकाळच्या वेळी हलकासा पाऊस झाल्यानंतर अचानक आवाज घोंघावत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांना ऐकू आले. रानमळा येथील खुशाल कुदळे व इतरांनी घराबाहेर येऊन पाहिले, तर त्यांना धरणाच्या पाण्यावर चक्रीवादळ घोंघावत असून पाण्याचे कारंजे उडाल्यासारखा भोवरा दिसत होता.
पाणीही सरळ रेषेत वर जात होते. हे वादळ एवढे तीव्र होते, की धरणातील पाणी जलवाहिनीप्रमाणे ढगापर्यंत गेल्याचे दिसत होते. दूरपर्यंत पांढरी रेषा दिसत होती आणि आवाजही तेवढाच येत होता. हवेची पोकळी आणि कमी-अधिक दाबामुळे धरणातील पाणी उचलून वर खेचले गेल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता.
वादळ एवढे भयानक होते, की पाण्याजवळील मोटारींच्या पेट्या उंच व दूरवर जाऊन पडल्या. परिसरातील काहींच्या घरांवरील पत्रे उडाले. हे वादळ धरणाच्या पाण्यावर असल्याने मोठी हानी झाली नाही. ते लोकवस्तीत शिरले असते तर मोठी हानी झाली असती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडीओ साधारणतः चार वर्षांपूर्वीचा असून तो व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नसून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणातील पाण्यात आलेल्या चक्रीवादळाचा आहे.
हेही वाचा- पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वाहून जाणाऱ्या पर्यटकांचा ड्रोन व्हिडीओ कारवारचा नाही! वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment