Press "Enter" to skip to content

उत्तरप्रदेशात जगातील सर्वात लांब गॅस पाईपलाईन म्हणत शेअर केला जातोय विदेशातील फोटो!

उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना सोशल मीडियावर एका गॅस पाईपलाईनचा फोटो शेअर केला जातोय. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे साधारणतः 10000 कोटींच्या गुंतवणुकीतून कांडला गोरखपूर गॅस पाईपलाईन (Kandla Gorakhpur Pipeline) या जगातील सर्वात लांब गॅस पाईपलाईनची निर्मिती करण्यात येत असल्याचा दावा केला जातोय. या 2,757 किमी लांबीच्या पाईपलाईनच्या माध्यमातून 34 कोटी घरांना गॅस पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात येतेय.

Advertisement

‘फेसबुकवर ‘मोदी वन्स मोअर’ या पेजवरूनही हाच फोटो आणि गोरखपूर पाईपलाईनचे दावे केले गेले आहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वेबसाईटवर 8 एप्रिल 2010 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार हा फोटो जर्मनीच्या बर्लिनमधील पाईपलाईनचा आहे.

Source: The New York Times

बातमीमध्ये फोटो गेट्टी इमेजेसच्या सौजन्याने छापण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही गेट्टी इमेजेसच्या वेबसाईटला भेट दिली असता, तिथे देखील हा फोटो बघायला मिळाला. वेबसाईटवरील माहितीनुसार, सिन गॅलप यांनी 8 एप्रिल 2010 रोजी जर्मनीतील ल्युबमिन जवळ हा फोटो घेतला होता.

Gas pipline germany getty image
Source: Getty Images

इंटरनेटवर कांडला गोरखपूर पाईपलाईनबद्दलची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की गुजरातमधील कांडला बंदर ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत पाइपलाइन टाकली जात आहे. ही देशातली सर्वात लांब गॅस पाईपलाईन ठरणार आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (IOC) ही पाईपलाईन टाकली जात आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून देशाच्या एक चतुर्थांश लोकसंख्येला स्वयंपाकाचा गॅस पुरवला जाणार आहे. अहमदाबाद, उज्जैन, भोपाळ, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी आणि लखनऊ या मार्गे गोरखपूरपर्यंत ही 2757 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जाणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपये खर्च येणार असून त्यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा 50 टक्के हिस्सा असेल. उर्वरित खर्च बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) या दुसऱ्या सरकारी कंपन्या उचलणार आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील जगातील सर्वात लांब पाईपलाईनचा म्हणून शेअर केला जात असलेला फोटो जर्मनीतील पाईपलाईनचा आहे.

गुजरातमधील कांडला ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर दरम्यान कांडला-गोरखपूर ही भारतातील सर्वात लांब पाईपलाईन टाकली जात आहे. या पाईपलाईनवरील खर्च इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांकडून उचलला जात आहे.

हेही वाचा- अखिलेश यादव छुप्या पद्धतीने मुस्लिम धार्जिणी आश्वासने देत असल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा