Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांच्या प्रदर्शनातील म्हणून काँग्रेसकडून शेअर केला जातोय सात वर्षांपूर्वीचा फोटो!

देशभरातील अनेक राज्यातील शेतकरी सध्या केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. (Farmer protests) हरयाणातील पिपली या ठिकाणच्या विरोध प्रदर्शनात तर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठ्याकाठ्या देखील चालवल्या. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय.

Advertisement

‘एका व्यक्तीवर बंदूक रोखून धरलेला पोलीस अधिकारी अन पोलिसाच्या दिशेने वीट भिरकावू बघणारा तो व्यक्ती’ असा हा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी जोडून शेअर केला जातोय. ‘मुंबई युथ काँग्रेस’च्या ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आलाय.

सगळीकडे हा फोटो ‘“मत मारो गोलियो से मुझे मैं पहले से एक दुखी इंसान हूँ..! मेरी मौत कि वजह यही हैं कि मैं पेशे से एक किसान हूँ..!’ या कॅप्शनसह शेअर केला जातोय.

अर्काइव्ह पोस्ट

छत्तीसगढ काँग्रेसच्या कसडोल येथील आमदार शकुंतला साहू, काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनयूएसआयचे राष्ट्रीय सचिव सतवीर चौधरी आणि एनयूएसआयशीच संबंधित नितीश गौर यांनी देखील हाच फोटो शेअर केलाय. याव्यतिरिक्त काँग्रेसशीच संबंधित इतरही अनेक व्हेरीफाईड अकाऊंटवरून हाच फोटो शेअर करण्यात आलाय.

फोटोच्या आधारे शेतकरी विरोधी मोदी सरकारचा निषेध करण्यात येतोय.

पडताळणी:

गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधला असता हा फोटो ‘द पायनियर’च्या वेबसाईटवर ३० सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित बातमीत हा फोटो वापरण्यात आल्याचे आढळून आले.

Screenshot of news telling this photo is 7yrs old with different context
Source: The Pioneer

बातमीनुसार उत्तर प्रदेशातील मेरठमधील खेडा येथील हा फोटो आहे. मुजफ्फरपूर येथील दंगलीप्रकरणी पोलिसांनी भाजप नेता संगीत सोमला अटक केली होती. सोमवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सोम समर्थक आणि पोलिसांच्या दरम्यान झटपट झाली होती. याचवेळचा हा फोटो आहे.

भाजप आमदार संगीत सोमवरील ‘NSA’चं कलम हटविण्याची तसेच मुज्जफरनगर दंगली प्रकरणातील इतरही आरोपींच्या सुटकेची मागणी सोम समर्थकांकडून करण्यात आली होती. या घटनेच्या वेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचं आणि केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत होतं.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अनेक काँग्रेस नेत्यांकडून केंद्र सरकारविरोधी शेतकऱ्यांच्या प्रदर्शनातील (Farmer protests) म्हणून शेअर केल्या जाणाऱ्या फोटोचा शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

फोटो जवळपास सात वर्षे जुना असून मूळ घटना घडली त्यावेळी केंद्रात काँग्रेसचंच सरकार सत्तेत होतं.

हे ही वाचा- ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि मालकाचे राजकीय कनेक्शन?’ वाचा काही महत्वाचे ‘फॅक्ट्स’!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा