स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्म संसदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणाविषयी (chicago speech) आपण बरंच काही ऐकलेलं आहे. विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवातच अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशा संबोधनाने केली आणि त्यानंतर कशाप्रकारे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने निनादून गेले, याविषयी देखील आपल्याला माहिती आहे. सोशल मीडियावर सध्या याच ऐतिहासिक भाषणाचा म्हणून साधारणतः २ मिनिटे ३० सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये स्टेजवरून भाषण देणारी एक व्यक्ती बघायला मिळतेय. त्या व्यक्तीची वेशभूषा अगदी तशीच आहे, जश्या प्रकारच्या वेषभूषेमध्ये विवेकानंदांचे अनेक फोटो उपलब्ध आहेत. व्हिडिओतील व्यक्ती देखील ‘सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका‘ अशा संबोधनाने आपल्या भाषणाची सुरुवात करताना बघायला मिळतेय.
“दुर्लभ ओरिजनल वीडियो 👌शायद कितने ही भाई होंगे जिन्होंने आजतक हिदू ह्रदय सम्राट श्री स्वामी विवेकानंद जी को देखा भी नही होगा जिन्होंने डूबते हुए सनातन धर्म को बचाया उन्ही श्री स्वामी विवेकानंद जी के व्याख्यान का ये एक दुर्लभ वीडियो जो स्वामी विवेकानन्द ने अमेरिका के शिकागो में 13 सितम्बर1893 को दिया। जरूर सुनें” या अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जातोय.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे बघायला मिळतेय.
पडताळणी:
व्हिडीओ लक्ष्यपूर्वक बघितला तरी आपल्या लक्षात येऊ शकते की हा व्हिडीओ कुठल्याशा नाटकातील किंवा चित्रपटातील असावा. व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.
आम्हाला श्री रामकृष्ण मठ चेन्नई या युट्यूब चॅनेलवरून २८ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे. ‘स्वामी विवेकानंद की आत्मकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. साधारणतः २ तासांच्या या चित्रपटाच्या १३ मिनिटे ४० व्या सेकंदापासूनचा भागाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना बघायला मिळतोय.
श्री रामकृष्ण मठ चेन्नई यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन कार्तिक एम.पी यांचे आहे. अभिनेते बालाजी मनोहर (Balaji Manohar) हे या चित्रपटात स्वामी विवेकानंदांच्या भूमिकेत आहेत. २०१३ मध्ये हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि तमिळ या 4 भाषांमध्ये एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
‘द हिंदू’च्या रिपोर्टनुसार विवेकानंदांच्या त्या ऐतिहासिक भाषणाचा व्हिडीओ उपलब्ध नाही. स्वामी विवेकानंदांवर संशोधन करणाऱ्या लेखिका मेरी लुईस बर्क यांच्यानुसार विवेकानंदांचे शिकागो येथील भाषण रेकॉर्डच करण्यात आले नव्हते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. स्वामी विवेकानंदांच्या (Swami Vivekananda) शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचा दुर्मिळ व्हिडीओ (chicago speech) म्हणून शेअर केला जात असलेला हा व्हिडीओ म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावरील चित्रपटातील क्लिप आहे. विवेकानंदांनी शिकागोतील धर्म संसदेत दिलेल्या भाषणाचं रेकॉर्डिंगच करण्यात आलं नव्हतं.
हेही वाचा- टोस्टला थुंकी लावणारा व्हायरल व्हिडीओतील बेकरी कामगार ‘आदिल’ पोलिसांच्या ताब्यात? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment