Press "Enter" to skip to content

प्रेमाचा संदेश देणारा व्हायरल फोटो अप्रतिमच, पण तो सध्याच्या युद्धजन्य युक्रेनमधला नाही!

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये एक तरुण आणि तरुणी एकमेकांना बिलगलेले दिसताहेत. तरुणाच्या पाठीवर युक्रेनचा राष्ट्रध्वज आहे, तर तरुणीच्या पाठीवर रशियन राष्ट्रध्वज बघायला मिळतोय. युक्रेन-रशिया युद्धाच्या संदर्भाने हा फोटो शेअर केला जातोय.

Advertisement

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी देखील शशी थरूर यांच्या सौजन्याने हा फोटो शेअर केलाय.

Source:Facebook

दरम्यान व्हायरल फोटो सध्याचा नसून जवळपास दोन वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येतेय. फोरमडेली या वेबसाईटवरील 5 डिसेंबर 2019 रोजीच्या बातमीनुसार हा फोटो बेलारूसिअन रॅपर मॅक्स कॉझ (Max Korzh) याच्या पोलंडमधील कॉन्सर्ट दरम्यानचा आहे.

फोटोमधील युवतीचे नाव ज्युलियाना कुझनेत्सोवा (Juliana Kuznetsova) असे आहे. मॅक्स कॉझ याच्या फॅनपेजवरून २९ नोव्हेंबर २०१९ रोजी हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.

Source: Instagram

फोटोमागची कहाणी

ज्युलियाना कुझनेत्सोवा ही रशियन, तर तिचा होणारा नवरा युक्रेनिअन. हे दोघेही रॅपर मॅक्स कॉझ याच्या पोलंडमधील कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी ज्युलियाना हिला जमलेल्या प्रेक्षकांमध्ये रशिया आणि युक्रेनचे ध्वज दिसले. तिने ते ध्वज मिळवले आणि फोटोग्राफरला फोटो घ्यायला सांगितला.

ज्युलियाना हिने हा फोटो घेतला त्यावेळी देखील युक्रेन आणि रशियामध्ये तणावाची परिस्थिती होती. रशियाचे राष्टपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यातील फ्रान्समध्ये होणाऱ्या शांतता करारावरील चर्चेसाठी आयोजित बैठकीपूर्वी घेण्यात आलेला हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता.

ज्युलियाना हिने ज्यावेळी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून हा फोटो पोस्ट केला, त्यावेळी त्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी राजकारणाच्या पलीकडील प्रेमाचा संदेश देणाऱ्या या फोटोचं प्रचंड कौतुक केलं, तर काहींना या प्रेमी युगलाला देशद्रोही ठरवलं. काहींनी त्या दोघांच्या प्रेमावर शंका घेत हा फोटो रशियन दुष्प्रचाराचा भाग असल्याचे देखील आरोप केले.

ज्युलियाना सांगते की हा फोटो घेण्यामागे आमचा कुठलाही राजकीय उद्देश्य नव्हता, परंतु ज्यावेळी हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला त्यावेळी जाणीव झाली की कदाचित हा फोटो लोकांमध्ये उमेद निर्माण करू शकेल. सर्व काही ठीक होऊ शकते, हा विश्वास निर्माण करू शकेल. प्रेम कुठल्याही गोष्टीला हरवू शकते.

हेही वाचा- युक्रेनवर रशियन हल्ल्याचा म्हणून न्यूज चॅनेल्सनी चालवला जुना व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा