लाल सिंग चड्ढा या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी तुर्कीला गेलेल्या आमिर खानने तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगन यांच्या पत्नीची भेट घेतली. तेव्हा पासून सोशल मीडियात आमिर खान विरोधातील खोट्या विखारी प्रचारास (Aamir khan fake news) मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या फेक दाव्यांसह अमीर खानला लक्ष्य केले जात आहे.
हज यात्रेदरम्यान दहशतवाद्यांची भेट.
दावा :
आमिर खानचा एक फोटो व्हायरल करण्यात येतोय. दावा केला जातोय की फोटोमध्ये आमिर खान सोबत दिसणाऱ्या दोन व्यक्ती लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य जुनैद समशेद आणि मौलाना तारिक आहेत.
वस्तुस्थिती :
साध्या गुगल रिव्हर्स सर्चने ह्या फोटोच्या खरे-खोटेपणाची माहिती मिळविणे अगदी सहज शक्य आहे. व्हायरल फोटो २०१३ सालचा असून फोटोत आमिर सोबत दिसणारी व्यक्ती जुनैद जमशेद आणि मौलाना तारिक जमील असून, त्यांचा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी काहीही संबंध नाही.
जुनैद जमशेद यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.
जुनैद जमशेद हे पाकिस्तानी संगीतकार होते. २०१६ साली झालेल्या एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. मौलाना तारिक जमील हे पाकिस्तानी धर्मोपदेशक आहेत.
आपल्या मुलांनी फक्त इस्लामचे पालन करावे यासाठी आग्रही
दावा :
कंगना राणावतने नुकतंच ट्विटर जॉईन केलंय आणि ट्विटर जॉईन करताच तिने आमिर खानवर हल्ला चढवलाय. कंगनाने कथितरित्या आमिर खानचा एक इंटरव्यूव्ह शेअर केलाय.
तन्क्विड नावाच्या पोर्टलवर प्रसिद्ध इंटरव्यूव्ह शेअर करत असताना तिने आमिर खानवर कट्टरपंथीय असल्याचा आरोप केलाय. आपल्या मुलांनी फक्त इस्लामचेच पालन करावे यासाठी आमिर आग्रही असल्याचं कंगनाने म्हटलंय.
वस्तुस्थिती :
मुळात कंगनाने शेअर केलेला २०१२ सालचा इंटरव्यूव्ह फेक (Aamir khan fake news) आहे. तन्क्विड नावाच्या या पोर्टलवर जाऊन बघितलं, तरी या पोर्टलला आमिर खान इंटरव्यूव्ह का म्हणून देईल असा प्रश्न पडतो. शिवाय हा इंटरव्यूव्ह फेक असून आमिरने असा कुठलाच इंटरव्यूव्ह दिला नसल्याचे आमिर खान प्रोडक्शनने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
स्वतः आमिर खाननेच २०१६ साली रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ मध्ये या प्रकरणाची माहिती दिली होती. आमिर खानने या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक देखील केली होती.
इस्लाम परवानगी देत नसल्याने मुहम्मद पैगंबरांवर चित्रपट बनवणार नाही
दावा :
“मी सत्यमेव जयते आणि पीके चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू अंधश्रद्धांचा लोकांच्या समोर आणल्या परंतु मी मुहम्मद पैगंबरांवर चित्रपट बनवणार नाही, कारण इस्लाम त्याची परवानगी देत नाही.” असं वक्तव्य आमिर खानच्या नावाने शेअर केलं जातंय.
वस्तुस्थिती :
आमिरने असं काही वक्तव्य दिल्याची बातमी कुठेच नाही. शिवाय त्याच्या ट्विटर हँडलवर देखील असं वक्तव्य सापडलं नाही. इतरही कुठल्या सोशल मीडिया हँडलवर आमिरने अशा प्रकारचं काही वक्तव्य दिलेलं आम्हाला सापडलं नाही. म्हणजेच आमिर असं काहीही बोललेला नाही. एक काल्पनिक वक्तव्य आमिरच्या नावाने शेअर केलं जातंय.
हे ही वाचा- ‘पिठाच्या पिशव्यांमध्ये १५००० रुपये वाटणारा दानशूर व्यक्ती आमीर खान नाही’
[…] हे ही वाचा- अमीर खानला हिंदूविरोधी ठरवण्यासाठी स… […]