लेखिका आणि पत्रकार शोभा डे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलाय. प्रशांत भूषण यांच्यावर त्यांच्या चेंबरमध्ये झालेल्या हल्ल्याची (attack on prashant bhushan) माहिती देणारा इंग्रजी न्यूज चॅनेलचा हा व्हिडीओ आहे.
‘धक्कादायक ! लज्जास्पद !’ असं कॅप्शन देऊन डे यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ जवळपास २४०० युजर्सनी रिट्विट केलाय.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
पडताळणी :
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचं नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दोषी ठरवलं असून त्यांनी कोर्टाची माफी मागावी, असं न्यायालयाने सुचवलं होतं. त्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला होता. प्रशांत भूषण यांनी मात्र न्यायालयाची माफी मागण्यास नकार देत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा मार्ग स्वीकारलाय. त्या निमित्ताने भूषण यांच्या नावाची चर्चा आहे.
अशा परिस्थितीत जर भूषण यांच्यावर हल्ला (attack on prashant bhushan) झाला असता, तर त्याची निश्चितच मोठी बातमी झाली असती. मात्र अशा प्रकारची कुठलीही बातमी नसल्याने आम्ही बातमीची पडताळणी सुरु केली.
व्हिडीओ नीट बघितला असता आपल्या लक्षात येईल की हा व्हिडीओ ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी न्यूज चॅनेलच्या बातमीचा आहे. कारण व्हिडीओमध्ये ‘टाईम्स नाऊ’चा लोगो आहे. व्हिडीओ ‘टाईम्स नाऊ’चा असल्याचे समजल्यानंतर आम्ही ‘prashant bhushan beaten up times now’ या किवर्डसह गुगल सर्च केलं असता आम्हाला ‘टाईम्स नाऊ’ची १३ ऑक्टोबर २०११ रोजीची बातमी मिळाली.
बातमीनुसार प्रशांत भूषण यांच्यावर काश्मीर प्रकरणी त्यांनी दिलेल्या वक्तव्यावर नाराज झालेल्या काही लोकांनी त्यांच्या चेंबरमध्ये घुसून हल्ला केला होता. याच घटनेशी संबंधित ‘इकॉनॉमिक टाईम्स’ची बातमी देखील आमच्या वाचनात आली. या बातमीनुसार तेजिंदर पाल सिंग बग्गा आणि विष्णू वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
तेजिंदर पाल सिंग बग्गा सध्या दिल्ली भाजपचे प्रवक्ते आहेत आणि गेल्या वर्षी झालेली दिल्ली विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवलेली आहे.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की वकील प्रशांत भूषण यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ खरा आहे, मात्र तो जवळपास दशकभरापूर्वीचा आहे. त्याचा सध्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
हे ही वाचा- चीनमध्ये ३ धरणे फुटून प्रलय आल्याचे दाखवण्यासाठी वापरला जातोय ९ वर्षे जुना व्हिडीओ!
Be First to Comment