Press "Enter" to skip to content

बॉक्सिंगपटू निखत झरीनचा तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडून तब्बल 50 लाखांचा चेक देऊन गौरव? वाचा सत्य!

भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीन (Nikhat Zareen) हीने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. निखतने 52 किलो वजनी गटात थायलंडच्या जुटामास जितपोचा (Jutamas Jitpong) 5-0 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अशा प्रकारची कामगिरी करणारी निखत ही मेरी कॉम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी यांच्यानंतर पाचवी भारतीय महिला बॉक्सिंगपटू ठरली.

Advertisement

देशभरात निखतच्या या यशाचा जल्लोष साजरा केला जात असतानाच सोशल मीडियावर निखत आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे निखतला एक चेक देत असताना बघायला मिळताहेत. हा फोटो शेअर करताना दावा केला जातोय की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 50 लाखांचा चेक देऊन निखतचा गौरव केला आहे.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा फोटो अशाच प्रकरच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

Source: Facebook

पडताळणी:

गुगलवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला ANI या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 20 मे रोजी करण्यात आलेले ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण जिंकल्याबद्दल निखत झरीनचे अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या प्रोत्साहनामुळे निखत सुवर्णपदकाला गवसणी घालू शकली, ही अभिमानाची बाब असल्याचे देखील त्यांनी सांगितल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये कुठेही चंद्रशेखर राव यांनी निखतसाठी 50 लाखांच्या बक्षिसाची घोषणा केल्याची किंवा तिला 50 लाखांचा चेक सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय इतरही कुठल्या माध्यमामध्ये अशा प्रकारची बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.

सोशल मीडियावरील व्हायरल फोटो नेमका कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली असता आम्हाला 2014 मधील एका फेसबुक पोस्टमध्ये हा फोटो बघायला मिळाला. असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून हा फोटो शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी हैदराबादमध्ये बॉक्सर निखत झरीनला 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले होते.

Source: Facebook

डेक्कन क्रॉनिकलच्या वेबसाईटवर 16 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार या कार्यक्रमात झरीन व्यतिरिक्त सायना नेहवाल, गगन नारंग, पारुपल्ली कश्यप, पी.व्ही. सिंधू, गुरुसाईदत्त, ज्वाला गुट्टा, किदाम्बी श्रीकांत, बी. अरुणा रेड्डी आणि ममता पुजारी या खेळाडूंचा तसेच पुलेला गोपीचंद आणि मोहोम्मद आरिफ या प्रशिक्षकांचा देखील बक्षीस देऊन गौरव करण्यात आला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला निखत झरीन आणि के. चंद्रशेखर राव यांचा फोटो सध्याचा नसून जवळपास 8 वर्षांपूर्वीचा आहे. 2014 साली के.चंद्रशेखर राव यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा गौरव केला होता. याच कार्यक्रमातील फोटो सध्याचा म्हणून व्हायरल होतोय.

हेही वाचा- ‘ईद’ तर नाहीच, परंतु ‘१५ ऑगस्ट’ आणि ‘२६ जानेवारी’ सुद्धा आपले राष्ट्रीय सण नाहीत!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा