Press "Enter" to skip to content

चीनमध्ये ३ धरणे फुटून प्रलय आल्याचे दाखवण्यासाठी वापरला जातोय ९ वर्षे जुना व्हिडीओ!

‘करावे तसे भरावे’, जगाला कोरोना देऊन जगाचे नुकसान केले म्हणून नियतीने धडा शिकवला आणि तीन धरणे फुटून चीन मध्ये हाहाकार (flood in china) माजल्याचे दावे करत एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय.

Advertisement

काय आहे व्हायरल व्हिडीओ सोबतचा मेसेज?

चीनमध्ये प्रचंड पावसामुळे तीन धरण फुटली आणि महापूर आला!!!!

अमानवीय कृत्य करुन अति स्वार्थी महत्वाकांक्षेपोटी संपुर्ण जगाला भिकेला लावून स्वत:ला महासत्ता बनविणाऱ्या चीनला नियतीने काय धडा दिला ते प्रत्यक्ष पहा.

पहा जल महा प्रलयाचा तांडव. शेवटी काय “करावे तसे भरावे”

Source: Whatsapp

हा अशा पद्धतीने सदर व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल होत असल्याचं ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजीव पाटील, मुकेश काळे आणि दिग्विजय डुबल यांनी ‘9172011480’ या आमच्या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधून निदर्शनास आणून दिले.

हाच मेसेज फेसबुक आणि ट्विटरवर कॉपी पेस्ट करत शेअर होतोय.

🙆‍♂️ चीन मध्ये प्रचंड पावसामुळे तीन धरण फुटली आणि महापूर आला!!!!अमानवीय कृत्य करुन अति स्वस्वार्थी महत्वाकांक्षेपोटी संपुर्ण जगाला भिकेला लावून स्वत:ला महासत्ता बनविणार्या चीनला नियतीने काय धडा दिला ते प्रत्यक्ष पहापहा महाजल प्रलयाचा तांडवशेवटी काय "करावे तसे भरावे"

Posted by Babasaheb Barkul on Tuesday, 25 August 2020

अर्काइव्ह पोस्ट

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

कोरोना व्हायरसचा कहरानंतर अतिवृष्टीमुळे चीनला महापूराचा (flood in china) सामना करावा लागला. जेथून कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला त्या वूहान प्रांताला देखील या प्रलयाचा तडाखा बसला. सध्या मात्र चीन मध्ये ३ धरणे फुटल्याने महापूर आल्याची कोणतीही बातमी नसल्याने चेकपोस्ट मराठीने व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यास सुरुवात केली.

व्हायरल व्हिडीओ २०११ सालचा

व्हायरल व्हिडिओच्या काही कीफ्रेम्स (स्क्रीनशॉट) आम्ही यांडेक्स इमेज सर्चवर (yandex image search) शोधल्या. तेव्हा या की फ्रेम्सशी मिळता जुळता असा एक व्हिडिओ आम्हांला www.fnn.jp या वेबसाईटवर मिळाला. Fnn ही जपानी वेबसाईट असून यावरील ‘Remembering 3/1’1 या पेजवर व्हायरल व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे पुराचे दृश्य जपानमधील मियागी प्रांतातील इशिनोमाकी शहरातील असल्याचे या वेबसाईटवर सांगण्यात आलंय. मार्च २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या विध्वंसक त्सुनामी दरम्यान व्हायरल व्हिडिओ चित्रित करण्यात आलाय. तसेच www.fnn.jp या वेबसाईटद्वारे २६ ऑक्टोबर २०१२ ला हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आलाय. तसचं इतरही काही युट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ २०१२ दरम्यान अपलोड करण्यात आलाय.

२०११ जपानमधील त्सुनामी

ब्रिटानिकाने पब्लिश केलेल्या माहितीनुसार ११ मार्च २०११ साली जपानच्या आग्नेय किनारपट्टीला दुपारी २.४५ वाजता ९.० रिश्टर स्केल एवढा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्सुनामी आणि त्यानंतर न्युक्लीअर पॉवर स्टेशनमध्येही या तडाख्याने काही अपघात झाले. या सर्वाचा परिणाम म्हणून जपानमध्ये तब्बल २०,००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या आपत्तीला ‘ग्रेट सेन्डाई अर्थक्वेक’ किंवा ‘ग्रेट तोहोकु अर्थक्वेक’ असेही म्हणतात.

थ्री गॉर्जेस डॅम’ आणि ‘तीन धरणे’ यात गल्लत

जगातले सर्वात मोठे धरण ‘थ्री गॉर्जेस डॅम’ चीन मधील यांगत्से नदीवर आहे. दोन महिन्यापूर्वी काही तज्ज्ञांनी या धरणाविषयी धोक्याचा ईशारा दिला होता. हे जर फुटले तर प्रचंड मोठे नुकसान होईल. चार दिवसांपूर्वी म्हणजे २२ ऑगस्टरोजी पब्लिश झालेल्या एशियान्यूजच्या बातमीत या धरणाविषयी बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांच्या दाव्यांचे खंडन केले. पाण्याची पातळी वाढली असली तरी धरणाला कसलाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे धरण बांधण्यासाठी तब्बल १८ वर्षे काम चालू होते.

वस्तुस्थिती:

‘स्वार्थी महत्वाकांक्षेपायी जगाला वेठीस धरणाऱ्या चीनला नियतीने चांगलाच धडा शिकवला’ या व्हायरल दाव्यासह शेअर होत असलेला व्हिडिओ ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळून पाहिला असता तो चीन मधील नसून तो जपान मध्ये २०११ साली आलेल्या त्सुनामीचा असल्याचे स्पष्ट झाले.

‘थ्री गॉर्जेस डॅम’विषयी येणाऱ्या बातम्यांना तोडून मोडून ‘तीन धरणे फुटले’ सांगत खोटे दावे आणि व्हिडीओ व्हायरल करण्याचा खोडसाळपणा कुणीतरी केलाय.

हेही वाचा: कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक? गौडबंगाल असण्याची शक्यता?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा