Press "Enter" to skip to content

शेतकरी आंदोलनाला ‘देशद्रोही’ ठरवण्यासाठी भाजप नेत्याने शेअर केला ७ वर्ष जुना फोटो!

शेतकरी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियानातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत असताना सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये पगडी परिधान केलेली शीख व्यक्ती तिरंग्याला बुटाने मारत असल्याचं दिसतंय. (sikh men disrespecting tricolour)

Advertisement

भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री सतीश कसार यांच्या फेसबुक अकाऊंटवरून सदर फोटो पोस्ट करण्यात आलाय. त्यासोबत ‘हमारे राष्ट्रीय ध्वज का अपमान करना ही किसान आंदोलन नही है,#मैं_थूकता_हु_ऐसे_किसान_आंदोलन_पर हमे धिक्कार है ऐसे किसान आंदोलन पर‘ अशा वाक्यांत कॅप्शन देण्यात आले आहे.

bjp leader shared pic to claim indian flag been insulted by farmer in protest
Source: Facebook

फेसबुकवर अशा पद्धतीचे अनेक दावे करण्यात आले आहेत ते आपण ‘येथे’ वाचू शकता.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. ‘दल खालसा‘ या ब्लॉगस्पॉट साईटवर मूळ इमेज आम्हाला सापडली.

वेबसाईटवर दि. १७ ऑगस्ट २०१३ रोजी अपडेट केलेल्या अनेक इमेजेस पैकी ही एक इमेज आहे. किंबहुना त्यावर ‘टाईम स्टॅम्प’ सुद्धा दिसून येतोय, ज्यावर सदर फोटो १५ ऑगस्ट २०१३ रोजी दुपारी १.३१ वाजता क्लिक केल्याचे दिसतेय.

काय आहे ‘दल खालसा’?

पंजाबमधील अमृतसर मध्ये १९७८ साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. खलिस्तानवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन उभी राहिलेली ही संस्था आहे. सदर व्हायरल फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मनमोहन सिंह खालसा आहे. काही बातम्यांनुसार मनमोहन सिंह खालसा यांचे २०१७ सालीच निधन झाले आहे.

२०१३ साली भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१३ रोजी सेन्ट्रल लंडनमध्ये शीख, काश्मिरी आणि इतर अल्पसंख्यांक लोकांनी एकत्र येऊन भारताने काश्मीर व पंजाब मध्ये केलेल्या कारवायांच्या विरुद्ध निदर्शने केली होती. त्यावेळी त्यांनी तिरंगा पायदळी तुडवला होता. ‘दल खालसा यूके’कडून त्यापूर्वी देखील अनेक वेळा 1984 मध्ये शीख समुदायावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लंडनमध्ये मोर्चाचे आयोजन केले गेले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की शीख व्यक्ती तिरंग्याला बुटाने मारत असल्याचा व्हायरल फोटोचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. फोटो २०१३ सालचा म्हणजे तब्बल ७ वर्षे जुना असल्याचे यातील व्यक्ती खलिस्तानवादी विचारसरणीच्या ‘दल खालसा’ संघटनेचा नेता आहे. शिवाय ही घटना देखील भारतातील नसून लंडनमधील आहे.

हे ही वाचा: आंदोलक शेतकरी रामाचा विरोध करताहेत का? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा