‘जे भारताला जमलं नाही ते अमेरिकेने करून दाखवलं’ असं म्हणत १०० डॉलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली एक इमेज सोशल मीडियात व्हायरल होतेय. (King Shivaji on 100 dollar Note)
अमेरिकेने १९ फेब्रुवारी ‘जागतिक छत्रपती दिन’ म्हणून घोषित करत शिवरायांची प्रतिमा १०० डॉलरच्या नोटेवर छापून मोठा सन्मान बहाल केलाय अशा मजकुरासह नोटेची इमेज असलेले ग्राफिक्स फेसबुकसह इतरही सोशल मीडियात व्हायरल होतेय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनीत अनगळ आणि राजेंद्र काळे यांनी हेच दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी ‘जागतिक छत्रपती दिन’ नावाने कुठला दिन साजरा करावा असा अमेरिकेचा प्रस्ताव आहे का हे तपासून पाहिले. आमच्या पडताळणीत अशा नावाचा कुठलाही दिन साजरा करावा किंवा केला जात असल्याचा एकही अधिकृत पुरावा नसल्याचे समोर आले.
राहिला प्रश्न १०० डॉलरच्या नोटेवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा (King Shivaji on 100 dollar Note) तर ‘चेकपोस्ट मराठी’ने या आधीच अशा प्रकारच्या दाव्यांची पडताळणी केली आहे ज्यात याच १०० डॉलरच्या नोटेवर कधी महात्मा बसवेश्वर होते तर कधी डॉ, बाबासाहेब आंबेडकर.
नोट एक फोटो अनेक
आम्ही व्हायरल पोस्टमधील नोटेचा फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता CL 01985909B या क्रमांकाच्या १०० डॉलरच्या अनेक नोटा आम्हाला सापडल्या ज्यांवर विविध लोकांचे चेहरे होते. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही प्रतिमा त्या नोटेवर छापली असल्याच्या व्हायरल पोस्ट्स आमच्या निदर्शनास आल्या.
काय आहे या नोटांचे सत्य?
ऍडव्हान्स्ड की-वर्ड्सच्या सर्चअंती आम्हाला अशा काही वेबसाईट्स सापडल्या जेथे आपण आपला फोटो अपलोड करून स्वतःच्या फोटोची १०० डॉलर नोट बनवू शकतो. गंमत म्हणजे यावरील क्रमांक तोच आहे. (Basveshwara 100 dollar note)
प्रयोग म्हणून आम्ही ‘चेकपोस्ट मराठी’चा लोगो टाकून पाहिला. आता ही नोट सर्वत्र पसरवून आम्ही म्हणावे का की अमेरिकेने भारताचा-महाराष्ट्राचा गौरव करत एका मराठी ‘फॅक्टचेक न्यूज वेबसाईट’चा लोगो १०० डॉलरच्या फोटोवर छापला? अर्थातच नाही.
खऱ्या नोटेवर कुणाचा फोटो?
वस्तुतः वसाहतींना एकत्र करत अमेरिका निर्माण करणाऱ्या ‘फादर ऑफ अमेरिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेन्जामिन फ्रँकलिन यांचा फोटो १०० डॉलरच्या नोटेवर आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर छापण्यात आलेली नाही. या अशा प्रकारच्या नोटांवर फोटो छापण्याची सुविधा म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग आहे. (King Shivaji on 100 dollar Note)
अमेरिकेने गौरव केला म्हणजेच आपले महापुरुष महान होते हा खूप मोठा गैरसमज आहे. आपल्याला त्यांचे कर्तुत्व आणि विचार महान वाटतात म्हणून ते महान असतात, यासाठी अमेरिका किंवा इतर कुणाच्या शिक्क्याची गरज नसायला हवी आणि त्यासाठी अशाप्रकारे फेक गोष्टी पसरवणे हाच मुळात त्या महापुरुषांचा अपमान आहे.
हेही वाचा: टाईम्स स्क्वेअरच्या भव्य जाहिरात फलकांवरील श्रीरामाच्या प्रतिमांचे व्हायरल फोटोज फेक!
[…] […]