तालिबानने (Taliban) अफगाणिस्थान ताब्यात घेतल्यापासूनच देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगणिस्थानातून (Afghanistan) येणाऱ्या फोटोज आणि व्हिडीओजच्या माध्यमातून या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. तालिबानने नियंत्रण हातात घेतल्यापासूनच अफगाणिस्थानमधील महिलांना मोठ्या प्रमाणात बंधनांना सामोरे जायला लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
सोशल मीडियावर बुरखा घातलेल्या तीन महिलांचा एक फोटो शेअर केला जातोय. या महिलांच्या पायांना साखळीने जखडण्यात आले आहे. दावा केला जातोय की ही अफगाणिस्थानातील महिलांची आजची परिस्थिती आहे. तालिबान्यांच्या राजवटीत महिलांना अमानुष अशा प्रकारची अमानुष वागणूक दिली जाते.
सोशल मीडियावरील याच व्हायरल फोटो आणि दाव्यांच्या आधारे ‘न्यूज १८ हिंदी’ने बातमी देखील प्रकाशित केली आहे. या बातमीमध्ये देखील साखळदंडातील कैद महिलांचा फोटो वापरण्यात आलाय.
‘टीव्ही ९ भारतवर्ष’चे अँकर शुभांकर मिश्रा यांनी हा फोटो ट्विट केलाय. अनेकांकडून हा फोटो रिट्विट देखील करण्यात आलाय.
पडताळणी:
ट्विटरने शुभांकर मिश्रा यांची पोस्टला ‘Manipulated Media’ असं टॅग केलंय. एखाद्या युजरने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास ट्विटरकडून अशा प्रकारे टॅग दिला जातो. त्यामुळे फोटो नेमका कधीचा आहे आणि त्यामाध्यमातून नेमकी कशा प्रकारे दिशाभूल केली जातेय हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली.
आम्हाला इंटरनेटवर २०११ साली अपडेट करण्यात आलेल्या वेगवेगळ्या ब्लॉग पोस्टमध्ये सध्या व्हायरल होत असलेला फोटो बघायला मिळाला. या फोटोमध्ये कुठेच महिलांच्या समोर चाललेल्या पुरुषाच्या हातात साखळदंड बघायला मिळत नाही. एक पुरुष रस्त्याने चाललेला आहे आणि त्याच्या मागोमाग महिला देखील चालताना दिसताहेत.
इंटरनेटवरील ब्लॉग पोस्टवरून हे स्पष्ट झाले की एक तर हा फोटो गेल्या साधारण १० वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. शिवाय फोटोत कुठेही साखळदंड नाही. महिला केवळ एका पुरुषाच्या मागे चालताना दिसताहेत. म्हणजेच हा फोटो एडिटेड आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल फोटोसोबतच्या दाव्यांप्रमाणे हा फोटो २०२१ मधला नसून गेल्या जवळपास १० वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. शिवाय फोटो एडिटेड आहे. मूळ फोटोमध्ये नसलेली साखळी या फोटोत एडिटिंगच्या मदतीने दाखविण्यात आली आहे.
तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्थानातील नागरिकांचे जगणे असह्य केले आहे ही वस्तुस्थिती आहे. ते दाखवण्यासाठी एडीटेड फोटोज किंवा फेक दाव्यांचा आधार घेण्याची गरज नाही.
हेही वाचा- तालिबानी अतिरेकी अफगाणी महिलांचा लिलाव करत असल्याचे व्हायरल दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment