तबलिगी जमात संबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘तब्लीगी जमातीमुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचे पुरावे (tablighi jamaat fake news) नाहीत. त्यांना बळीचा बकरा बनवले गेलेय’ या शब्दांत टिपण्णी केलीय.
दिल्लीच्या मरकजमध्ये जमा झालेल्या तब्लिगी जमातीचा भारतभर कोरोना व्हायरस पोहचवण्यात मोठा हात असल्याच्या बातम्या सगळ्याच माध्यमातून दाखवण्यात आल्या. त्यांनतर मुस्लिम समाजाविषयी तेढ निर्माण करणाऱ्या अनेक अफवा ट्विटर फेसबुक, व्हॉटस् अप वर फॉरवर्ड करण्यात आल्या.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहचलेल्या, तबलिगी जमातीला कोरोनाच्या प्रसारासाठी जबाबदार ठरविणाऱ्या दहा महत्वाच्या फेक बातम्या (tablighi jamaat fake news) आणि अफवांची पोलखोल करणारा हा स्पेशल रिपोर्ट.
१. मुस्लिम फळविक्रेता फळांवर थुंकी लावत असल्याचा व्हिडिओ.Advertisement
दावा:
एक मुस्लिम फळविक्रेता फळांवर थुंकी लावत असल्याचा दावा प्रचंड व्हायरल झाला होता. दावा करण्यात आला होता की कोरोनाच्या प्रसारासाठी जाणीवपूर्वक असे केले जात आहे. हा व्हिडिओ देशभरात फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता.
वस्तुस्थिती:
मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील हा व्हायरल व्हिडिओ असून यात दिसणारा माणूस मनोरुग्ण आहे. त्याच्या मुलीने आपल्या वडिलांना पैसे मोजण्याची सवय असल्याने त्यांनी फळांना देखील पैशांसारखेच मोजले असल्याचे सांगितले.
हा व्हिडिओ खरा असून याविषयी पोलीस तक्रार देखील करण्यात आली होती. याबद्दल दैनिक भास्करने सविस्तर बातमी केली होती.
फळविक्रेत्याचे कृत्य स्वच्छतेच्या दृष्टीने संशयास्पद दिसून येत असल्याने त्या व्यक्तीची चौकशी देखील करण्यात आली आणि त्यावर कलम २६९ आणि २७० अन्वये कारवाई करण्यात आली. परंतु सदर कृत्य कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी करण्यात आल्याची गोष्ट रायसेन पोलीस अधीक्षकांनी नाकारली आहे.
व्हिडिओ फेब्रुवारी २०२० मधील असून तोपर्यंत रायसेनमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता, ना ही त्या व्यक्तीचा ‘तब्लीगी जमात’शी काही संबंध आहे.
२. मुस्लिम तरुण भांडी चाटत असल्याचा व्हिडिओ.
दावा:
कोरोना व्हायरस पसरवण्याचा हेतूने मुस्लिम तरुणांचा एक गट भांडी चाटत असल्याचे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
वस्तुस्थिती:
याच ट्वीटला उत्तर देत ‘इंडियन डिफेन्स फोरम’चे संपादक युसुफ उंजावाला यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून व्हायरल ट्विट रीट्विट करून याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल व्हिडिओ त दिसणारे तरुण दाऊदी बोहरा समाजाचे आहेत. अन्नाचा कणही वाया न घालण्यावर विश्वास ठेवणाऱ्या दाना कमिटीशी ते संबंधित आहेत.
ते तरुण स्वच्छ भांडी चाटत नव्हते तर जेवण केलेली खरकटी भांडी धुण्याआधी त्यातील सगळे अन्न खात होते. जेवल्यानंतर भांडी चाटून साफ करणं ही एक या संप्रदायातील धार्मिक विधी आहे.
मुळात हा व्हिडीओ आताचा नसून दोन वर्षांपूर्वीचा आहे. ३१ जुलै २०१८ रोजी व्हिमिओवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामुळे याचाही संबंध तब्लीगी जमात किंवा कोरोनाशी नाही.
३. कोरोना पसरवण्यासाठी मुस्लिम लोक मुद्दाम शिंकत असल्याचा दावा.
दावा:
एका व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीतील हजरत निजामुद्दीन मशिदीत प्रार्थना करणारे लोक कोरोना व्हायरसचा प्रसार व्हावा या हेतूने शिंकत असल्याचा दावा करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
मूळ व्हिडीओ युट्युबवर २९ जानेवारी २०२० रोजी अपलोड केलेला आहे. याचा अर्थ त्या आधीच कधीतरी तो शूट झालेला असणार. वस्तुस्थिती अशी की भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. यामुळे या जुन्या व्हिडीओचा भारतातील कोरोना व्हायरसशी संबंध असण्याचे तार्किक कारण सापडत नाही.
तसेच व्हायरल व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्यास त्यातील लोक शिंकत नसून एका विशिष्ठ पद्धतीने श्वास आत बाहेर घेत असल्याचे लक्षात येईल. याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम धर्माचाच एक भाग असणाऱ्या सुफी पंथा मध्ये जिक्र नावाची परंपरा आहे.
या परंपरेनुसार सुफी पंथाच्या दर्ग्यात एकत्र येऊन सुफी पद्धतीने बसत श्वास आत बाहेर टाकत अल्लाहच्या नावाने जप केला जातो. जिक्र परंपरा व्यवस्थितरीत्या समजून घेण्यासाठी आपण युट्यूबवरील हा व्हिडीओ बघू शकता.
४. कोरोनाच्या प्रसारासाठी मुस्लिम तरुण पोलिसांवर थुंकल्याचा व्हिडिओ.
दावा:
क्वारंटाईन होणं टाळता यावं आणि कोरोनाचा प्रसार करता यावा यासाठी मुस्लिम तरुण पोलिसांवर थूंकल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘मुंबई मिरर’च्या २ फेब्रुवारी २०२० रोजीच्या बातमीनुसार हा व्हिडिओ खरा असून तो ठाण्यातील आहे. पोलिसांवर थुंकणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद सोहेल शौकत अली असे आहे.
कुटुंबीयांनी घरून बनवून आणलेलं जेवण पोलिसांनी खाऊ न दिल्याने मोहम्मदने पोलिसांशी वाद घातला आणि रागाच्या भरात तो पोलिसांच्या अंगावर थुंकला देखील. त्यांनतर गाडीतील पोलिसांनी त्याला चोप दिल्याचे देखील आपण व्हिडीओत पाहू शकता.
व्हायरल व्हिडिओ संदर्भात करण्यात आलेल्या दाव्यानुसार पडताळून पाहिले असता व्हिडिओतील गाडीत एकही आरोग्य कर्मचारी दिसून येत नाही तसेच कोणीही मास्क अथवा पिपिई किट घातल्याचे दिसत नाही.
५. अन्नात थुंकणाऱ्या रेस्टॉरंट कर्मचाऱ्याचा व्हिडीओ
दावा:
रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पॅकिंग करत असलेल्या कामगाराचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. जेवणाचे हे पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच हा मुस्लिम कर्मचारी त्यावर थूंकत असल्याचा दावा या व्हिडिओसह करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येईल की तो व्यक्ती त्या अन्नाच्या पाकिटात थुंकत नसून ते फुगवण्यासाठी हवा भरतोय. अर्थात हे सुद्धा किळसवाणे आणि आरोग्यास हानिकारक आहे. परंतु हा व्हिडिओ सध्याचा नसून एप्रिल २०१९ पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर व्हिडीओ २७ एप्रिल २०१९ रोजी युट्युबवर अपलोड करण्यात आला होता.
मलेशिया, सिंगापूर, यूएई या देशांमध्ये देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इतकेच नव्हे तर सिंगापूरमध्ये याविरुद्ध सिंगापूर फूड एजन्सीकडे तक्रार देखील करण्यात आली होती.
६. आयसोलेशन वॉर्डमध्ये तबलिगी नग्न अवस्थेत पळत असल्याचा दावा
दावा:
एक नग्न अवस्थेतील व्यक्ती इमारतीतील काच फोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ तील व्यक्ती तबलीगी जमातीचा सदस्य असून १४ दिवसांच्या आयासोलेशनमध्ये देखील हे लोक अश्लिल चाळे करत असल्याचा दावा करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
सदर व्हिडीओ २०१९ मधील असून तो भारतातील नाही. गुलशन ए हदीद, कराची येथील मशिदीमध्ये घुसलेल्या एका माथेफिरूचा तो व्हिडीओ आहे. मूळ व्हिडीओ युट्युबवर २५ ऑगस्ट २०१९ रोजी अपलोड करण्यात आलाय.
७.क्वारंटाईन असतांना नॉनव्हेज न दिल्याने धुमाकूळ घालत, तबलिगी जमतीच्या लोक उघड्यावर शौचाला बसल्याचा दावा.
दावा:
क्वारंटाईन असतांना नॉनव्हेज न दिल्याने धुमाकूळ घालत, तबलिगी उघड्यावर शौचाला बसल्याचा दावा करण्यात आला होता. अमर उजाला, पत्रिका यांसारख्या माध्यमांनीसुद्धा या बातम्या दिल्या होत्या.
वस्तुस्थिती:
सहारनपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ही घटना खोटी असल्याचे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले होते.
८. तबलिगीमूळे १०० परिचारिकांनी राजीनामा दिल्याचा दावा.
दावा:
तबलिगी जमातीचे सदस्य अंगावर थुंकल्याने राजस्थान मधील झालावाड येथील शंभरहून अधिक परिचारिकांनी राजीनामा दिल्याचा तसेच जमातीतील लोकांनी केलेली बिर्याणीची मागणी पूर्ण न केल्याने वॉर्ड बॉयला शिवीगाळ केल्याचे मेसेज फॉरवर्ड करण्यात आले होते.
वस्तुस्थिती:
मुळात कमी वेतन आणि त्यातही पीपीई किट न दिल्यामुळे राजस्थानमधील झालावाडच्या रुग्णालयातील शंभरहून अधिक परिचारिकांनी राजीनामा दिल्याची बातमी न्यूज नेशनच्या वेबसाईटवर देण्यात आली होती.
न्यूज नेशनच्या याच बातमीचा स्क्रिनशॉट घेऊन त्याचा संबंध तबलिगी जमातीशी जोडण्यात आला. मुळात या बातमीचा आणि तबलिगी जमातीचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. न्यूज नेशनची विस्तृत बातमी आपण बघू शकता.
९. इराण, इटली देशातील कोरोना पॉझिटिव रुग्ण पाटण्यातील मशिदीत लपल्याची बातमी.
दावा:
कोरोना चाचणी टाळण्यासाठी इराण, इटली या देशातील परदेशी नागरिक पाटण्यातील मशिदीत लपल्याचा दावा व्हायरल व्हिडिओसह करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
पडताळणीनूसार ही घटना पाटण्यातील कुर्जी येथील गेट नंबर ७४ जवळ असणाऱ्या मशिदीतील आहे. व्हिडीओतील लोक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किर्गिस्तानमधून तबलिगी जमातसाठी भारतात आले होते.
या लोकांना मशिदीत पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. तेव्हा पोलिसांनी या विदेशी लोकांना AIIMS मध्ये नेऊन त्यांची कोरोना चाचणी केली. त्यात या सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. दिघा समाचारने त्यांचे रिपोर्ट पब्लिश केले होते.
१०. ANI या वृत्तसंस्थेकडूनच तब्लीगी जमातचा कोरोनाशी संबंध.
दावा:
तब्लीगी जमातच्या सदस्यांशी संपर्क आल्याने नोईडाच्या सेक्टर पाच हारोला येथील काही लोकांना क्वारंटाईन केल्याची बातमी ANI या वृत्तसंस्थेने नगरचे डीसीपी संकल्प शर्मा यांच्या हवाल्याने दिली होती. यालाच आधार मानून इतर अनेक माध्यमांनी अशीच बातमी चालवली.
वस्तुस्थिती:
सदर बातमी चुकीची असून क्वारंटाईन केलेले लोक पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. यात कुठेही तब्लीगी जमातचा संबंध नाही. ANI तुम्ही चुकीची माहिती देत आहात आणि फेक न्यूज (tablighi jamaat fake news) पसरवत आहात असे ट्विट नोईडाच्या डीसीपींनी केले होते. त्यानंतर ANIने आधीचे ट्विट डिलीट केले आणि बातमी दुरुस्त केली.
साभार- या रिपोर्टच्या संकलनासाठी Alt News, Boom Live आणि The Lallantop या वेबपोर्टलचे साहाय्य लाभले आहे.
हे ही वाचा:
बाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकांचे व्हायरल फोटोज मुंबईच्या महम्मद अली रोडचे नाहीत
वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘तो’ व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा !
[…] हे ही वाचा- ‘तब्लीगी जमात’ कोरोना काळात फेकन्युज… […]
[…] हेही वाचा: ‘तब्लीगी जमात’ कोरोना काळात फेकन्युज… […]
[…] हे ही वाचा- ‘तब्लीगी जमात’ कोरोना काळात फेकन्युज… […]