Press "Enter" to skip to content

इंस्टाग्राम वर मुलींचे न्यूड फोटोज टाकून गँग रेप करणाऱ्या मुलांची एक्स्पोज लिस्ट फेक!

सध्या काही इंस्टाग्राम प्रोफाईल्सची एक लिस्ट व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. या लिस्ट सोबत ‘गर्ल्स मध्ये सेंड कर. यातून कोणाची रिक्वेस्ट आली तर अक्सेप्ट नको करू असं सांग. ही मुलं गँगरेप करणारी आहेत. ही लिस्ट एक्स्पोज झाली आहे.’ असा मेसेज देखील फिरत आहे.

काही ठिकाणी याच लिस्ट सोबत दुसरा एक मेसेज फिरत आहे. त्यात असं लिहिलं गेलंय की, ‘तुझे सगळे इंस्टाग्राम फोटोज अर्काइव्ह कर. कारण एक बॉईज लॉकर ग्रुप आहे, त्यात ते प्रायव्हेट अकाउंट ओपन करत आहेत आणि त्यातल्या फोटोंचे न्युड्स बनवून ब्लॅकमेल करत आहेत. १०० बॉईज होते त्या ग्रुप मध्ये एक सापडला आणि त्याने ही सगळी माहिती दिली. बाकी तुझ्या ओळखीतल्या इतरही मुलींना हे कळव.’

पडताळणी:

६ मे २०२० रोजी ‘बॉईज लॉकर रूम’ची एक बातमी देशभर गाजली होती. त्या बातमीचा आणि या व्हायरल मेसेजचा काही संबंध आहे का? किंवा हे मेसेज आणि ती इंस्टाग्राम प्रोफाईल्सची लिस्ट या बातमीच्या संबंधातील आहे की अजून काही वेगळीच घटना उदयाला येतेय की काय यासाठी आम्ही पडताळणीला सुरुवात केली. सर्वात आधी आम्ही त्या लिस्टचा फोटो गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्च वर टाकून पाहिला. त्या संबंधातील ट्विट आणि बातम्या आमच्या समोर आल्या.

आपण पाहू शकता की NDTVच्या बातमीमध्ये ब्लर करून वापरण्यात आलेली प्रोफाईल्सची लिस्ट आणि आपल्या दाव्यात व्हायरल होणारी लिस्ट तंतोतंत जुळते. आता हे क्लीअर झालं होतं की ही लिस्ट त्याच बातमीच्या संबंधातील आहे.

काय होती ती घटना?

  • दिल्लीच्या नामांकित शाळांमधील दहावी बारावीच्या मुलांनी एक इन्स्टाग्राम ग्रुप बनवला होता. ज्यामध्ये ते मुलींचे एडीट केलेले नग्न फोटोज टाकत होते आणि त्यावर अश्लाघ्य भाषेत एकमेकांत चर्चा करत होते.
  • या चर्चांचे स्क्रीनशॉट आणि मुलांच्या प्रोफाईल्सची यादी काही मुलींनी सर्वांसमोर आणली.
  • त्या मुलींवरील राग म्हणून त्यांचे न्यूड फोटोज ग्रुप मध्ये टाकू, त्यांना अद्दल घडवण्यासाठी आपण त्यांच्यावर गँगरेप करू असे चॅट त्या ग्रुपवर झाले आणि त्याचेही स्क्रीनशॉट बाहेर आले.
  • यावर दिल्लीच्या महिला आयोगाने मोठी भूमिका निभाऊन त्यावर पोलीस कारवाई करायला भाग पाडलं.
  • आताचं स्टेटस असं आहे की हा ग्रुप बनवणाऱ्याला म्हणजेच अॅड्मीनला अटक झाली आहे. ग्रुप मधील सर्वांचे फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी आणण्यासाठी इन्स्टाग्रामची मुख्य कंपनी असणाऱ्या फेसबुक कडे पाठपुरावा चालू आहे. आणि ग्रुप मधील मुलांची तासंतास कसून चौकशी होत आहे.

गँगरेप बद्दलचे चॅट बॉईज लॉकर रूमचे नाही:

या बातमी नंतर ११ मे रोजी इंडियन एक्स्प्रेसने नवी बातमी प्रकाशित केली. त्यात असे सांगितले आहे की या केसची चौकशी करणारे DCP (सायबर सेल) अन्येश रॉय यांनी एक्स्प्रेस सोबत बोलताना बॉईज लॉकर रूम संदर्भात चौकशी करताना काही नवीन गोष्टी प्रकाशात आल्या आहेत.

या ग्रुपच्या स्क्रीनशॉट्स सोबत फिरणारे ‘गँगरेप’ संबंधीचे चॅट ‘बॉईज लॉकर रूम’ मधील नाही. मुळात ‘बॉईज लॉकर रूम’ हा इन्स्टाग्राम ग्रुप होता आणि हे ‘गँगरेप’बद्दलचे चॅट ‘स्नॅपचॅट’ या अॅपवर झालेलं आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या जोडीदाराची मानसिकता तपासण्यासाठी एका मुलीने सिद्धार्थ या नावाचं फेक अकाऊंट काढून त्याच्याशी स्वतःचेच फोटो शेअर करून ‘गँगरेप’ करू असे ती म्हणाली. यात त्या मुलाचे चारित्र्य तपासणे एवढाच काय तो तिचा हेतू होता. परंतु हे चॅट व्हायरल झाले आणि बॉईज लॉकर रूमसोबत जोडले गेले.

वस्तुस्थिती:

६ मे २०२०ची ही घटना आहे. पडताळणीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यामुळे दाव्यात सांगितल्याप्रमाणे आता ही मुलं तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास देऊ शकणार नाहीत.

आणि ‘गँगरेप’ बद्दलचे चॅट या ग्रुपचे नसून ती एका मुलीची शक्कल होती. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. या बातम्यांचा आधार घेऊन मुलींमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी कुणीतरी जाणूनबुजून केलेला हा खोडसाळपणा आहे.

जर तुमच्या फोटोजसोबत कुणी छेडछाड करत असेल, कुणी कुठल्याही मार्गाने सोशल मिडीयावर त्रास देत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची प्रोफाईल त्यांच्या सेटिंगमध्ये जाऊन रिपोर्ट करू शकता आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. तूर्तास या अशा मेसेजवर अजिबात विश्वास ठेऊ नका आणि ते फॉरवर्डसुद्धा करू नका, आम्ही या अशा अफवेला ‘चेकपोस्ट’वर मोठा लाल सिग्नल लाऊन अडवत आहोत.

हे ही वाचा – ‘सुदर्शन’च्या संपादकांने कॉमेडी व्हिडीओचा तुकडा वापरून ‘मिया’ची खिल्ली उडवली.

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा